मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 26 मार्च 2022 (08:58 IST)

धाडी पडणार हे भाजपच्या नेत्यांना आधीच कसं समजतं? सुप्रिया सुळेंचा सवाल

महाराष्ट्रामध्ये मागील काळात महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी पडल्या आहेत. त्यामध्ये कारवाई होऊन अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे मंत्री आता तुरुंगात आहेत. नुकतंच ईडीने मुख्यमंत्र्यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यावर कारवाई करत त्यांची 6.45 कोटींच्या संपत्तीवर टाच आणली आहे. ईडीची ही कारवाई म्हणजे थेट ठाकरेंना आव्हान असल्याचं सांगितलं जातंय.
 
यामुळे राज्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांच्या मुद्द्यावरुन वाद सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनीही यावरुन भाजपवर टीका केली असताना दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत हा मुद्दा उपस्थित केला.
 
ईडी आणि सीबीआय यांच्या स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह उभारतोय. या संस्था जर स्वतंत्र असतील तर महाराष्ट्रातील कोणता नेता तुरुंगात जाणार हे भाजपच्या नेत्यांना आधीच कसं समजतं? भाजप नेते याबद्दल आधीच कसं ट्वीट करतात? असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी केला. तसेच यासंबंधी माहिती लीक होते, त्याबद्दल केंद्र सरकारने खुलासा करावा असं ही त्या यावेळी म्हणाल्या.