बायको सासरी येत नसल्याने पतीने केला हल्ला, सासूचा जागीच मृत्यू
सासरी येण्यास नकार दिल्याने पती-पत्नीत शाब्दिक वाद झाला. ह्या वादामुळे पतीने बायकोला धारदार विळ्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी भांडण सोडविण्यास गेलेल्या सासूवर जावयाने धारदार शस्त्राने वार केला. जावयाने पोटावर व पाठीत कात्री भोसकल्याने सासूचा जागीच मृत्यू झाला. या हल्ल्यात पत्नी आणि अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्लेखोर जावयाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इगतपुरी-त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या सरहद्दीवर झारवड येथे रविवारी (दि.२२) ही धक्कादायक घटना घडली. याबाबत, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदुबाई किसन पारधी (३६) ही महिला आपली १२ वर्षीय मुलगी माधुरी हिला घेऊन काही दिवसांपूर्वी माहेरी झारवाड येथे आली होती. ही महिला त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कळमुस्ते येथे वास्तव्यास आहे.
दरम्यान, पतीला दारूचे व्यसन असल्याने तो विनाकारण मारहाण करत असे. सततच्या त्रासाला कंटाळून, ही महिला माहेरी आली होती. रविवारी सासरी आलेल्या जावयाने किसन महादू पारधी (४२) याने पत्नीला घरी येण्याबाबत आग्रह केला. पण पत्नीने नकार दिला. याचदरम्यान पती-पत्नीत शाब्दिक वाद झाला. राग अनावर झाल्याने पतीने विळ्याने पत्नी इंदुबाई हिला मारायला सुरुवात केली.
दरम्यान, सासू कमळाबाई सोमा भूताम्बरे (५५) रा. जोशीवाडी, झारवाड, या भांडण सोडविण्यास गेल्याने, किसन पारधी याने कमळाबाई यांच्या पोटात व पाठीवर कात्रीने भोसकून वार केले. यात कमळाबाई यांचा जागीच मृत्यू झाला. तर या घटनेत पत्नी इंदूबाई व मुलगी माधुरी या गंभीर जखमी झाल्या. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात (civil) दाखल करण्यात आले आहे.
या घटनेने आरडाओरडा झाल्याने नागरिक जमा झाले. त्यांनी संशयित किसन महादू पारधी यास पकडून ठेवले. घोटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन किसन यास ताब्यात घेतले. किसन याच्याविरुद्ध खून, जीवे मारण्याचा प्रयत्न आदी कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाब पोलिस अधिक तपास करत आहे