शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: अहमदनगर , गुरूवार, 9 जुलै 2020 (16:11 IST)

मला रोहित पवारांच्या बोलण्यात तथ्य वाटत नाही – सुजय विखे

करोनाच्या अनुषंगाने नगर जिल्ह्याचा विचार करता केंद्राच्या निधीतून ५० व्हेंटिलेटर मिळणार आहेत. याशिवाय केंद्र सरकारकडून करोनाच्या अनुषंगाने राज्यातील रुग्णालयांना वेगवेगळे मेडिकल इक्यूमेंट दिले जात आहेत. पीपीई कीट दिले जात आहेत, मास्क दिले जात आहेत. हॉस्पिटलसाठी इक्यूमेंट देणे हे सुद्धा खर्चिक काम आहे. त्यामुळे राज्य सरकारला थेट आर्थिक साह्य करण्याची गरज काय, असा प्रश्न भाजपचे खासदार सुजय विखे यांनी विचारला आहे . अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात विखे यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची भेट घेतली व करोना अनुषंगाने आढावा घेतला. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, केंद्र सरकारकडून देण्यात आलेले व्हेंटिलेटर सदोष असल्याचा दावा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी नगरमध्ये बोलताना केला होता. त्याबाबत विखे यांना विचारले असता ते म्हणाले, ‘मी डॉक्टर आहे. मला तर व्हेंटिलेटरबाबत तसे काहीच वाटले नाही. व्हेंटिलेटर सदोष असल्याचे ते कोणत्या निकषावर बोलत आहेत? त्यांच्याकडे तसा काही अहवाल आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. उलट ग्रामीण भागामध्ये जेवढे व्हेंटिलेटर आहेत, ते केंद्र सरकारच्या निधीतील असून ते लावल्यामुळे एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्याची बातमी आमच्यापर्यंत आली नसल्याचेही विखे यांनी स्पष्ट केले.

राज्य सरकारकडे सध्या पैसे राहिलेले नाहीत. त्यामुळे ते रोज एक नवा नियम काढत आहेत. राज्याचे सचिव वेगळा नियम काढतात. मुख्यमंत्री वेगळा जीआर काढतात. महसूलमंत्री वेगळाच जीआर काढतात. तर, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी एवढचं काय तर गावचे सरपंच सुद्धा वेगळाच नियम काढत आहेत. त्यामुळे राज्यात मंत्री लॉक झाले आणि जनता अनलॉक झाली, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोण कुठे चालले, याचा कोणालाच काही पत्ता नाही,’ अशी टोलेबाजी सुजय विखे यांनी केली.