शिवसेनेत मी समाधानी, राणेचे दावे एकनाथ शिंदेनी फेटाळले
राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेत घुसमट सुरु आहे. ते केवळ सहीपुरतेच उरले आहेत. त्यांच्या खात्याचा कारभारही मातोश्रीवरुनच चालतो. त्यांनी भाजपात यावे, असा दावा काल केेंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला होता. मात्र राणे यांचा हा दावा मंत्री एकनाथ शिंदे यांनी फेटाळून लावला आहे. मी शिवसेनेत समाधानी असून माझी घुसमट होत नाही, असे प्रत्यूत्तर त्यांनी राणेंना दिले आहे.
एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की, मला कामाचं स्वातंत्र्य नाही. माझ्या विभागाचा कारभार मातोश्रीवरुन चालतो, हा शोध नारायण राणेेंनी कुठून लावला ते माहित नाही. मला माझ्या विभागात काम करताना पुर्ण स्वातंत्र्य आहे. अनेक प्रलंबित प्रश्न मी मंत्री म्हणून मार्गी लावले आहेत. बाळासाहेब ठाकरे समृध्दी मार्गाचे काम आम्ही पुढे नेत आहोत. मी पक्षात समाधानी आहे. त्यामुळे राणेेंच्या दाव्यात, त्यांच्या विधानात कोणतेही तथ्य नाही. त्यांचे वक्तव्य चुकीचे आहे, असेही शिंदे म्हणाले. तसेच राणे स्वत: युती सरकारमध्ये मुख्यमंत्री होते. राज्याशी निगडीत मोठा निर्णय किंवा धोरणात्मक निर्णय घ्यायचा असतो तेव्हा मुख्यमंत्र्यांना विचारवेच लागते. माझेच खाते नाही, कोणतेही खाते मुख्यमंत्र्यांच्या संमतीनेच सामुहिक निर्णय घेत असते. हे राणेंना माहीत असेल. एवढेच नव्हे तर ते उद्योग मंत्री आहेत. उद्या त्यांना मोठा निर्णय घ्यायचा असेल तर तो पंतप्रधानांना विचारूनच घ्यावा लागेल, अशी कोपरखळीही शिंदेेंनी यावेळी राणेेंना लगावली.