गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 18 जुलै 2021 (10:49 IST)

पंकजा मुंडे शिवसेनेत आल्या तर वरिष्ठ नेते योग्य सन्मान देतील'

पंकजा मुंडे या शिवसेनेमध्ये आल्या तर त्यांचं स्वागतच आहे, वरिष्ठ नेते योग्य सन्मान देतील, असं सूचक विधान वक्तव्य राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी केलं आहे.गृह राज्यमंत्री शंभुराजे देसाई बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.त्यावेळी ते बोलत होते.
 
"पंकजा मुंडे या बीड जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील प्रमुख नेत्या आहेत. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा वारसा त्यांच्याकडे आहे आणि त्या जर शिवसेनेमध्ये आल्या तर नक्कीच शिवसेनेमध्ये त्यांचे स्वागत होईल आणि त्यांचा योग्य मानसन्मान हा आमचे नेते करतील",असं शंभुराजे देसाई म्हणाले आहे.
 
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे पंकजा मुंडे आणि त्यांचे समर्थक नाराज झाले होते. पंकजा यांनी काही दिवसांपूर्वी दिल्ली वारीही केली. त्यांनी पंतप्रधानांची भेटही घेतली होती.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात नारायण राणे, कपिल पाटील, भारती पवार यांच्यासह भागवत कराड यांना स्थान देण्यात आलं आहे.
 
"मंत्रिपदाची मागणी हे गोपीनाथ मुंडेंचे संस्कार नाहीत. मला कधी वाटलं नाही, मला मंत्री करा संत्री करा. माझ्या समाजाच्या मंत्र्याला मी कशाला अपमानित करू. प्रीतमताई मंत्री नाही झाल्या. मी 45 वर्षांची आहे. कराड साहेब 65 वर्षाचे आहेत. मी त्यांचा अपमान करणार नाही", असं पंकजा यांनी सांगितलं होतं.
 
काही दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंकजा म्हणाल्या, जोपर्यंत शक्य तोपर्यंत धर्मयुद्ध टाळायचा प्रयत्न करणार आहे. मी कुणालाही भीत नाही. आपलं घर का सोडायचं?