शरद पवारांच नाव घेतलं की प्रसिद्धी मिळते, म्हणून ते नाव घेतात : अजित पवार
शरद पवारांनी कधीही जातीच राजकारण केलं नाही, कारण नसतांना शरद पवारांच नाव घ्यायचं, त्यांचं नाव घेतलं की प्रसिद्धी मिळते, म्हणून ते शरद पवारांचे नाव घेतात, घरात बसून यांना बोलायला काय जात? केसेस कार्यकर्त्यांवर होतील, अशा शब्दात अजित पवार यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी पालकमंत्री भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री पवार यांनी राज ठाकरेंवर ताशेरे ओढले. ते यावेळी म्हणले कि, राज ठाकरे मागच्या भाषणात जे बोलले तेच इथेही बोलले. मागच्या सभेतील भाषणच राज ठाकरेंनी रिपीट केलं. पण उगाचच काहीही बोलून सामाजिक तेढ निर्माण करणे चुकीचे आहे. जर कुणाच्या भाषणातून जातीय द्वेष पसरवला जात असेल तर हे महाराष्ट्राला परवडणारं नाही. महाराष्ट्रात कायद्याचं राज्य, कुणाचीही हुकूमशाही चालणार नाही. त्यामुळे कायद्याने, संविधानाने सांगितल्या प्रमाणे पालन सर्वांना करावं लागेल, असा असे इशारा त्यांनी यावेळी दिला.
ते पुढे म्हणाले कि, उत्तर प्रदेशात फक्त मशिदींवरील भोंगे उतरवले नाही, तर माझ्या माहितीप्रमाणे मंदिरांचे ही लाऊडस्पिकर बंद झाले. असे सरसकट बोलून काहीही साध्य होणार नाही. राज ठाकरे लोकसभेच्या वेळी ते भाजप विरोधात बोलत होते, त्यानंतर आता त्यांचं मतपरिवर्तन, मनपरिवर्तन झालं, आता त्यांनी राष्ट्रवादी, सेना विरोधात बोलायला सुरुवात केली आहे. कायद्याच्या विरोधात कुणी काही करेल तर पोलीस कारवाई करणार. राज ठाकरेंच्या सभेत अटी शर्तीचे पालन केले गेले नसेल तर पोलिसांनी पुढील कारवाई करावी, असे आवाहन त्यांनी पोलिसांनी दिले.
अशा पद्धतीने भाषण करून राज्याचा विकास साधला जाणार आहे का? राज्यात उष्णतेची लाट, भारनियमन, महागाई इतर अनेक प्रश्न महत्त्वाचे आहेत. पण त्यावर बोलायचे नाही, फक्त अल्टिमेटम द्यायचं. कुणी अल्टिमेटम देत असेल आणि त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असेल तर पोलीस यंत्रणा त्यांचं काम करेल, घरात बसून यांना बोलायला काय जात? केसेस कार्यकर्त्यांवर होतील, अशी समजही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिली.
यावेळी पवार यांनी आपल्या सुरक्षारक्षकाकडे नॅपकिन मागितला आणि राज ठाकरे यांची नाक पुसण्याची नक्कल केली. अजितदादांनी राज यांची नक्कल करताच उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला. नॅपकिन नाकाला लावत काय ते एकदाच शिकरुन घे, असा टोलाही राज यांना लगावलाय.