शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 22 एप्रिल 2023 (21:13 IST)

इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांना धमकीचा फोन, चुंभळे पिता पुत्रावर गुन्हा दाखल

इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांना धमकीचा फोन, चुंभळे पिता पुत्रावर गुन्हा दाखल  
 नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रचारावरून भाजप-शिवसेना शिंदे गटाच्या शेतकरी विकास पॅनलचे नेते शिवाजी चुंभळे यांनी थेट महाविकास आघाडीचे आमदार हिरामण खोसकर यांना फोनवरून धमकी दिल्याची धक्कादायक घटना उघडली आहे. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात शिवाजी चुंभळे यांच्यासह त्यांचे चिरंजीव अजिंक्य चुंभळे यांच्यावर अदखल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
नाशिकमध्ये १४ बाजार समित्यांच्या निवडणुकांचा रणसंग्राम सुरू असून, गुरुवारी माघारीची अंतिम मुदत संपल्यावर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. त्यामुळे शुक्रवारी  चिन्ह वाटप व याद्या जाहीर झाल्याने निवडणूक प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवार मतदारसंघ पिंजून काढत आहे. नाशिक कृषी बाजार समितीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप शिवसेना शिंदे गट असे चित्र असले तरी पिंगळे गट विरुद्ध चुंभळे गट अशी पारंपरिक लढत होतांना दिसत आहे. त्यामुळे दोन्ही गटांकडून मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू आहे.
 
महाविकास आघाडीमुळे इगतपुरी मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर हेदेखील पिंगळे गटासोबत प्रचार यंत्रणेत सहभागी झालेले आहेत. त्याचा राग मनात धरून शेतकरी विकास पॅनलचे नेते शिवाजी चुंभळे यांनी आमदार खोसकर यांना मोबाइलवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर चुंभळे यांचे चिरंजीव अजिंक्य चुंभळे यांनीदेखील आमदार खोसकर यांना धमकी दिली आहे. “मतदारसंघात फिरू नको, माझ्या बापाच्या नादी लागू नको, तू अजून आम्हाला ओळखले नाही. आमच्या नादी लागल्यावर काय परिणाम भोगावे लागतील, याचा विचार कर” अशा पद्धतीने वेळोवेळी धमकी दिली जात असल्याचे आमदार खोसकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor