शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 19 डिसेंबर 2021 (10:10 IST)

देशाच्या कोणत्याही भागात छत्रपतींचा अवमान हा निषेधार्हच-फडणवीस

"देशाच्या कुठल्याही भागात शिवछत्रपतींचा अवमान होत असेल तर या विकृतीचा निषेधच", असं विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. कर्नाटकमधील बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबनेसंदर्भात ते बोलत होते. 
"आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्र नाही,तर संपूर्ण देशाचे दैवत आहेत. राज्यांच्या आणि पक्षांच्या सीमा आमच्या या आदर्शाच्या सन्मानाआड कधीही येणार नाहीत.त्यामुळे देशाच्या कुठल्याही भागात शिवछत्रपतींचा अवमान होत असेल तर या विकृतीचा निषेधच! ज्यांनी संपूर्ण राष्ट्र एकसंध केले, अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सहन केला जाणार नाही, हे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई जी यांनीही स्पष्ट केले आहे. या प्रकरणातील काही आरोपींना सुद्धा अटक झाली आहे. आणखीही सत्य बाहेर येईलच", असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुतळा विटंबनेच्या घटनेवर भाष्य करताना रातोरात महाराष्ट्र एकीकरण समितीनं जे केलं, त्याचा आम्ही निषेध करतो. कुणीही कायद्याविरोधात गेलं, तर कारवाई ही होणारचं. गृहमंत्र्यांना तसे कारवाईचे आदेशही देण्यात आले आहेत. छोट्या-मोठ्या घटनेसाठी सावर्जनिक मालमत्तेचं नुकसान सहन केलं जाणार नाही, असं वक्तव्य केलं. बोम्मई यांच्या या वक्तव्याचाही शिवसेनेकडून निषेध व्यक्त केला जातोय.
 
"छत्रपती शिवाजी महाराज केवळ आमचेच नाहीत तर सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही. कर्नाटकातील मराठी जनतेवरील कानडी अत्याचार थांबवून या हिणकस आणि विकृत मनोवृत्तीचा बिमोड करण्यासाठी पंतप्रधानांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वतः यात लक्ष घालावे आणि तेथील राज्य शासनाला त्वरित संबंधितांवर कडक कारवाई करण्यास सांगावे", अशा तीव्र शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.