शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 3 फेब्रुवारी 2024 (09:30 IST)

मराठी साहित्यात तृतीयपंथीयांच्या दु:ख, व्यथा, वेदनांची मांडणी व्हावी

जळगाव : साहित्य समाजाचा आरसा आहे. राज्य घटनेत प्रत्येकाला समान हक्क व संधी प्रदान केले आहेत. असे असतांना मराठी साहित्यात तृतीयपंथीय समुदायाचे चित्रण दिसून येत नाही. तसेच तृतीयपंथीयांना समान वागणूक मिळत नाहीत. तेव्हा मराठी साहित्यिक व लेखकांनी तृतीयपंथीय, पारलिंगी समुदायाच्या दु:ख, व्यथा, वेदना, समस्या जाणून घेऊन साहित्यात चित्रण करावे, असा आशावाद ‘तृतीयपंथी समुदायाचे मराठी साहित्यातील चित्रण आणि स्थान’ विषयावरील परिसंवादात सहभागी वक्त्यांनी व्यक्त केला.
 
भारत निवडणूक आयोगाच्या अधीनस्त कार्यरत महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कविवर्य ना. धों. महानोर सभागृहात ‘तृतीयपंथी समुदायाचे मराठी साहित्यातील चित्रण आणि स्थान’ विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. परिसंवादात एलजीबीटीआयक्यू समुदायाचे अभ्यासक आणि बिंदू क्वीअर राइट्स फाउंडेशनचे अध्यक्ष बिंदुमाधव खिरे, तृतीयपंथी म्हणजेच पारलिंगी समुदायातील सामाजिक कार्यकर्त्या शमिभा पाटील, विजया वसावे, पूनीत्त गौडा, डैनियल्ला मॅक्डोन्सा आणि महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे हे सहभागी झाले होते.
 
मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे म्हणाले की, लोकशाहीच्या निवडणूक प्रक्रियेत तृतीयपंथीय समुदायाचे स्थान जसे महत्त्वपूर्ण आहे. तसे मराठी साहित्यात ही तृतीयपंथीय समुदायाचे वास्तववादी चित्रण झाले आहे. बिंदू माधव खिरे म्हणाले की, तृतीयपंथीय समुदायाचे साहित्यातील व समाजातील स्थान समजून घेतांना लिंग, लिंगभाव व लैंगिकता ह्या शब्दांचे अर्थ समजून घेतले पाहिजेत. पूनीत गौडा म्हणाले की, पारलिंग पुरूष जन्माने स्त्री असतो. मात्र मनाने तो पुरूष असतो. त्यांचे मन पुरूषाप्रमाणे घडत असते. डैनियल मॅक्डोन्सा म्हणाल्या की, माणसाला माणसाप्रमाणे वागविण्यासाठी धर्माची गरज पडत नाही. तृतीयपंथीय व्यक्तींचे मन समाजाने समजून घेतले पाहिजेत.
 
शमिभा पाटील म्हणाल्या की, पारलिंगी समुदायाचे साहित्यात चित्रण जास्त झाले नाही. अण्णाभाऊ साठे यांच्यानंतर अनेक वर्षांचा कालखंडात लिखाण झाले नाही. स्वाती चांदोरकर, दिशा पिंकी शेख, लक्ष्मी, पारू, मदन नाईक, नागा किन्नरी यांनी पारलिंगी समुदायाचे चित्रण त्यांच्या पुस्तके व कवितांतून मांडले आहे.
 
तृतीयपंथीय समुदायाची स्वतःची भाषा असते. तृतीयपंथी समाज आता समाज माध्यमातून लिहायला लागला आहे. साहित्य विश्‍वाने आमच्या जगण्याचे प्रश्‍न मांडले पाहिजेत. अशी अपेक्षा ही शमिभा पाटील यांनी व्यक्त केल्या. विजया वसावे यांनी वनरक्षक भरतीत त्यांना आलेल्या अनुभवाचे कथन केले.
 
 
Edited By -  Ratnadeep ranshoor