वाहतूक पोलिसाशी जीवघेणं वर्तन, बोनेटवर बसवून केला एक किलोमीटरपर्यंत सुसाट प्रवास
पिंपरी चिंचवडमध्ये पोलीस अधिकाऱ्याशीच जीवघेणं वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये कारवाईसाठी गाडी रोखणाऱ्या वाहतूक पोलिसास एका चालकाने बोनेटवर बसवून एक किलोमीटरपर्यंत सुसाट प्रवास केला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हीडिओदेखील समोर आला आहे. यात दुचाकीस्वार आणि रिक्षाचालकांच्या प्रसंगावधानामुळे पोलिसांचा जीव थोडक्यात बचावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाहतूक पोलिसांनी गाडी रोखण्याचा प्रयत्न केला पण तरीदेखील कार चालकाने गाडी थांबवली नाही. त्यामुळे पोलिसांनी गाडीच्या बोनेटसमोर जाऊन गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. गाडी समोर पोलीस आल्याचं पाहूनदेखील कार चालकाने गाडीचा वेग कमी केला नाही आणि चक्क एक किलोमीटरपर्यंत पोलिसासकट वेगाने प्रवास केला.
यावेळी रस्त्यावरील इतर नागरिकांनी आणि वाहन चालकांनी कार चालकास थांबवण्यासाठी अनेक विनवण्या केल्या पण तरीही चालकाने गाडी थांबवली नाही. अखेर दुचाकीस्वार आणि रिक्षावाल्यांच्या मदतीने पोलिसाची सूटका करण्यात आली. अहिंसा चौक ते चिंचवड पोलीस स्टेशन मार्गावर ही ही घटना घडली. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आबासाहेब सावंत असं वाहतूक पोलिसाचं नाव आहे तर 50 वर्षीय युवराज हणवते असं कार चालकाचं नाव आहे.