हे सुसंस्कृत महाराष्ट्र किंवा भारतीय संस्कृतीत कधी असं पाहिलं नाही, हे दुर्दैवी : सुळे
शिवसेना नेते व परिवनहमंत्री अनिल परब यांना ईडी कडून नोटीस बजावण्यात आली असून, त्यांना ३१ ऑगस्ट रोजी ईडी कार्यलयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. यावर आता राज्यातील नेते मंडळींकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी देखील वर्धा येथे माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
”आमच्या जेष्ठ नेत्यांना, सगळ्या मंत्र्यांना टार्गेट केले जात आहे, असं मी कधीच पाहिलं नाही . कुणाच्या आईला, कुणाच्या बायकोला पोलीस स्टेशनला बोलविल्या जातं. ही कुठली संस्कृती आहे? ते काय विचार करतात हे मी नाही सांगू शकत, पण हे सुसंस्कृत महाराष्ट्र किंवा भारतीय संस्कृतीत कधी असं पाहिलं नाही, हे दुर्दैवी आहे.” असं त्या म्हणाल्या आहेत.
तर, दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड झालेल्या चर्चेबाबत त्यांना प्रश्न विचारल्यावर त्यांनी यावर उत्तर देताना, एखाद्या विरोधी पक्षनेत्यांची किती कामं मुख्यमंत्रीकडे असतात. आम्ही दोन्हीकडे राहिलो आहेत. त्यामुळं आम्हाला चांगलं माहीत आहे. एखाद्या विरोधी पक्षनेत्याने मुख्यमंत्री यांची भेट घेतली तर गैर काय?” असं म्हणत पत्रकारांनाच प्रतिप्रश्न केला.