बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 सप्टेंबर 2022 (22:17 IST)

इतिहास घडविण्यासाठी इतिहासाचा मागोवा घेणे गरजेचे : भारती पवार

इतिहास घडविण्यासाठी इतिहासाचा मागोवा घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आरोग्य व कुटुुंब कल्याण मंत्रालयाच्या मा. केंद्रीय राज्यमंत्री नामदार श्रीमती डॉ. भारतीताई पवार यांनी केले. आरोग्य विद्यान विद्यापीठ आणि राष्ट्रीय अनुसूचित जनजाति आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे मुख्यालयात आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आरोग्य व कुटुुंब कल्याण मंत्रालयाच्या मा. केंद्रीय राज्यमंत्री नामदार श्रीमती डॉ. भारतीताई पवार, अध्यक्षा विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प्रमुख वक्ते जनजाति कल्याण आश्रम पश्चिम महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. भरत केळकर व राष्ट्रीय अनुसूचित जनजाति आयोगाचे सदस्य श्री. मिलिंद थत्ते सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते समवेत  प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी एन.व्ही. कळसकर, समन्वयक डॉ. सुनिल फुगारे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
 
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी तसेच आरोग्य व कुटुुंब कल्याण मंत्रालयाच्या केंद्रीय राज्यमंत्री नामदार श्रीमती डॉ. भारतीताई पवार यांनी सांगितले की, नव्या पिढीवर देशाचे भविष्य आहे इतिहासाची माहिती त्यांनी घेतली पाहिजे तरच ते इतिहास घडवू शकतील. देशातील प्रत्येक नागरिकांने समाजहितासाठी कार्य करावे ज्याची इतिहासात नोंद घेतली जाईल. यासाठी समाजातील प्रत्येक घटकाचे योगदान महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्य संग्रामात अनेक जनजाति नायकांचे कार्य उल्लेखनीय आहे. सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासामध्ये समाजातील सर्व स्तरातील विशेषतः जनजाति समाजातील लोकांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे. याची माहिती सर्वांना व्हावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
    
त्या पुढे म्हणाल्या की, जनजाति समाजाने पर्यावरण रक्षणासाठी भरीव कार्य केले आहे. जल, जंगल व जमीन यांचे रक्षण ते आजही करतात. वैयक्तीक स्वार्थाचा विचार न करता समाजासाठी व राष्ट्रासाठी कार्य करण्याची निस्वार्थ भावना त्यांच्यात असते. हा आदर्श आपणही घ्यावा जेणेकरुन पुढील पिढीला ते प्रेरणादायी ठरेल, त्सुनामी सारखे नैसर्गिक संकटे असतील किंवा बिष्णोई समाजाने वनरक्षणासाठी केलेला उठाव, बिरसा मुंडा यांचे शौर्यगाथा आदी अभिमानास्पद कार्य या समाजाने देशासाठी केले असल्याचे त्यांनी सांगितले.
         
अध्यक्षीय मनोगतात विद्यापीठाच्या  कुलगुरु लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव निमित्त विद्यापीठाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. अनुसूचित जनजाति नायकांची स्वातत्र्यासाठीची संघर्ष कहाणी प्रेरणादायी आहे. राष्ट्रभक्ती व समाजात संघर्षमय चळवळ करतांना अनेक जनजाति नायकांनी बलिदान दिले आहे त्यांचे कार्य गौरवास्पद आहे. विद्यार्थ्यांनी जनजाति नायकांची माहितीतून आदर्श घ्यावा. आयोगातर्फे प्रदर्शन लावण्यात आले आहे. विद्यार्थी व जनतेला या प्रदर्शनाचा लाभ घेता यावा यासाठी राष्ट्रीय जनजाति आयोगाला विद्यापीठाचा सभागृह उपलब्ध करुन दिला जाईल अशी घोषणा त्यांनी केली. विद्यापीठाने नुकताच ’ब्लॉसम’ उपक्रमाला प्रारंभ केला असून विदर्भात जनजाति समूहातील व्यक्तींचे आरोग्य संदर्भात स्क्रिनींग करण्यात येत आहे. या उपक्रामातून विविध आजारांची स्थिती, आकडेवारी लक्षात येईल व त्याव्दारे उपाययोजना करण्यात येणार आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी विद्यापीठ परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली असून विद्यापीठ परिसार ’ग्रीन कॅम्पस’ मध्ये रुपांतरीत होत असल्याचे त्यांनी सांगितल.
 
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. भरत केळकर यांनी सांगितले की, स्वातंत्र्य चळवळीत लोकनायकांच्या योगदानाची हजारो नावे आहेत ज्यांची आपणांस फारशी माहिती नाही. जनजाति समाजातील लोकांनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी मोठे काम केले आहे. स्वातंत्र्यासाठी सन 1857 च्या युध्दात अनेक जनजाति नायकांनी बलिदान दिले आहे. यासर्व जनजाति नायकांचा इतिहास समाजाला मुख्यतः तरुण पिढीला व्हावा त्यातून चांगले आदर्श घ्यावेत. आजही अशी अनेक लोकगीते व कथा आदिवासी समाजात प्रचलित आहेत. स्वातंत्र्यासाठी इंग्रजांशी झालेला संघर्ष कथा त्यांनी अधोरेखित केल्या. भारतीय संस्कृती तळागाळापर्यंत रुजली आहे याचा अनुभव कोविडच्या काळात आला. काम करतांना निस्वार्थ वृत्तीने काम करा त्याचा चांगला प्रतिसाद तुम्हाला मिळेल असे त्यांनी सांगितले.
         
राष्ट्रीय अनुसूचित जनजाति आयोगाचे प्रतिनिधी श्री. मिलिंद थत्ते यांनी सांगितले की, स्वातंत्र्य संग्रामात जनजाति समाजातील लोकांनी शौर्याने राष्ट्ररक्षणात महत्त्वाचे योगदान दिले आहे.  या समाजाने इंग्रजांची गुलामगिरी कधीच स्वीकारली नाही आणि वेळोवेळी सशस्त्र बंड आणि संघर्षही केले आहेत. त्यांच्या वीरकथांची माहिती सर्वांना कार्यक्रमाच्या माध्यमातून करुन देत आहोत. सुशिक्षित समाजातही मोठया प्रमाणात जनजाति नायकांची कार्याची सखोल माहिती नाही ती प्रदर्शन व पुस्तकांच्या स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात येत आहे. शासनाने यासाठी विविध उपक्रम राबविले असून त्यांचा प्रचार व प्रसार तळागाळापर्यंत होणे गरजेचे आहे. जनजाति समाजातील लोकांची कार्य व कर्तृत्व याबाबती संशोधन व्हावे ज्यातून युवा पिढीला नवीन प्रेरणा मिळेल असेही त्यांनी सांगितले.
        
राष्ट्रीय अनुसूचित जनजाति आयोगाचे प्रशिक्षित वक्ते श्री. बाळू घुटे यांनी प्रास्ताविकात स्वातंत्र्य संग्रामात जनजाति नायकांचे योगदान या कार्यक्रमाची उद्दिष्टये व संयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ यांनी मानले.
        
राष्ट्रीय अनुसूचित जनजाति आयोगातर्फे पोस्टर स्वरुपात जनजाति नायकांचे छायाचित्र व थोडक्यात माहितीचे प्रदर्शन कार्यक्रमस्थळी मांडण्यात आले आहे. सदर प्रदर्शनाचे संयोजन आयोगाचे संयोजक अशोक भुसारे व  तुषार मिसाळ यांनी केले आहे.