1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 20 ऑगस्ट 2018 (09:00 IST)

आमच्यासाठी गरीबांच्या घराची चूल महत्त्वाची - जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादी कनेक्ट दौऱ्यातील विदर्भ टप्प्याच्या अखेरच्या दिवशी त्यांनी कार्यकर्ता मेळाव्यास संबोधित केले.
 
सरकार जर पराभवाला घाबरत असेल तर हे सरकार लवकर निवडणूक घेईल. त्यामुळे या निवडणुकीसाठी जय्यत तयारी आपण करायला हवी. नोव्हेंबरमध्ये जरी निवडणूक झाली तरी आपण ताकदीने सामोरे जाऊ, असे ते म्हणाले. २०१४ ला नरेंद्र मोदी यांनी विकास करण्याचे आश्वासन दिले होते मात्र सर्व आश्वासनांचा या सरकारला विसर पडला आहे. या जिल्ह्यातील भाजपचे खासदार नाना पटोले यांनी आपली खासदारकी सोडली. याला नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार कारणीभूत आहे, असेही ते म्हणाले. शेतकऱ्यांना, गरीबांना, सामान्य जनतेला जी आश्वासने सरकारने दिली त्याची पूर्तता सरकारने केली नाही. म्हणून पटोले यांनी राजीनामा दिला, असे जयंत पाटील म्हणाले.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन योजनेंतर्गत बँक खाते उघडायला सांगितले मात्र आता एक बातमी अशी वाचली की आरबीआयने फतवा काढला आहे. ज्या खात्यामध्ये व्यवहार झाले नाहीत ते खाते रद्द केले जाणार आहे. म्हणजे ती योजना किती अनियोजित होती हे स्पष्ट होते, असे ते म्हणाले. नरेंद्र मोदी जगभर फिरले मात्र आपल्या गोंदिया जिल्ह्यात एकही नवा प्रकल्प आणण्याचे काम त्यांनी केले नाही, याचा त्यांनी उल्लेख केला.
 
मधुकर कुकडे यांचा विजय सांगतो की देशात आता २०१४ सारखी परिस्थिती राहिली नाही. लोकांना वाटू लागले आहे की आपण नरेंद्र मोदी यांना नेतृत्व देऊन चूक केली. लोक भाजपला मतदान करणार नाहीत फक्त आपल्याला थोडी मेहनत घ्यावी लागेल, असा सल्ला त्यांनी दिला. रुपयाची किंमत घसरली आहे. मोदी विरोधात असताना रुपयाची किंमत घसरली की आगडोंब करायचे. आता रुपयाने ७०चा आकडा पार केला आहे. मोदी आता काही का बोलत नाहीत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. देशाला आर्थिक संकटात ढकलण्याचे काम मोदी यांनी केले. एकही अर्थतज्ञ्ज नरेंद्र मोदी यांच्यासोबत राहिला नाही. हवा तसा कारभार मोदींतर्फे केला जात आहे. सरकारने गॅस सिलिंडरचे दर वाढवले. नावापुरत्या योजनांची घोषणा केली. मात्र आज गॅसचे दर ८०० वर गेले आहेत. भाजपचे सरकार गेले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आले तर गॅसाला सबसिडी देऊन दर कमी करू असे वचन त्यांनी दिले. आमच्यासाठी गरीबांच्या घराची चूल महत्त्वाची आहे, असेही ते म्हणाले.
 
केरळमध्ये पुराने थैमान घातले आहे. हजारोचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. केरळने मदतीची मागणी केली मात्र केंद्र सरकारने फक्त ५०० कोटी दिले. स्वतःच्या दौऱ्यासाठी, जाहिरातीसाठी हजारो कोटी खर्च केले जातात मात्र केरळला मदत करताना सरकारने आखडते हात घेतले. राजा हा उदार मनाचा असला पाहिजे पण आजचा राजा तसा नाही म्हणून या लोकांच्या मनात त्याच्या विरोधात द्वेष उत्पन्न झाला आहे, असे जयंत पाटील यावेळी म्हणाले.