झाले भगवतीच्या मूळ रूपाचं दर्शन,सप्तश्रृंगी देवीची मूर्ती संवर्धन व देखभालीचे काम पूर्ण
साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध पीठ असलेल्या वणीच्या सप्तश्रृंगी देवीची मूर्ती संवर्धन व देखभालीचे काम पूर्ण झाले असून भगवतीच्या मूळ रूपाचं दर्शन होत आहे. देवीच्या मूर्तीवरून अकराशे किलो शेंदूर काढण्यात आल्यानंतर आई सप्तशृंगी देवीचे मूळ रूप पहिल्यांदाच समोर आले आहे. भगवतीचे मूर्ती संवर्धन आणि देखभाल करण्यासाठी मागील ४५ दिवसापासून मंदिर दर्शनासाठी बंद असून मूर्ती संवर्धनाचे काम पूर्ण झाले आहे. अशात देवीच्या मूर्तीचे काही फोटो समोर आले आहे आणि यामध्ये मूर्ती संवर्धनाच्या कामानंतर आई भगवतीच्या रूपात झालेला मोठा बदल पाहायला मिळत आहे. मूर्तीचा कायापायलट झालेला दिसून येत आहे.
मूर्ती संवर्धन प्रक्रिया सुरू केल्यानंतर भगवतीच्या स्वरूपावरील मागील कित्येक वर्षांपासून साचलेला शेंदूर लेपनाचा भाग कवच हा धार्मिक व शास्त्रोक्त पद्धतीने काढण्यात आला आहे. ६ ते ८ सप्टेंबर दरम्यान धार्मिक पूजा हवन विधीचे आयोजन केले आहे. त्यानंतर पितृपक्षात १६०० देवी अथर्वशीर्ष पठण अनुष्ठान सर्व भक्तांच्या कल्याणासाठी म्हणून नवरात्र पूर्वी होणार आहे. २६ सप्टेंबर घटस्थापनेपासून देवी दर्शनासाठी खुले होणार आहे. त्यामुळे घटस्थापनेला सप्तशृंगी मातेच्या मूळ रूपाचं दर्शन सर्व भाविकांना घेता येणार आहे. त्यासाठी भाविकांनी व्यवस्थापनास योग्य सहकार्य करावे, असे आवाहन विश्वस्तांच्या वतीने करण्यात आले आहे.
श्री भगवतीची मूर्ती जवळपास १० फूट उंच व आठ फूट रूट आकारात व एकूण १८ हातांत भिन्न प्रकारातील अस्त्र व शस्त्र असून, त्यात उजव्या हातात (खालील बाजूकडून वरील बाजूकडे अक्षरमाला, कमल, बाण, खडग, वज्र, गदा, चक्र, त्रिशूल, परशू, तर डाव्या हातात (खालील बाजूकडून वरील बाजूकडे कमंडलू, पानपात्र, धनुष्य, चर्म, कालदंड शक्ती, पाष, घंटा, शेख आहे. ही शस्त्र-अस्त्र विविध देवदेवतांची प्रतीके असल्याचे म्हटले जाते. श्री भगवतीची मूर्ती अतिप्राचीन व विश्वातील एकमेव भव्य आकार व प्रकारातील ती एकमेव स्वयंभू मूर्ती आहे. वर्षानुवर्षे त्यावर शेंदूर लेपन सुरु आहे. तसेच सप्तश्रृंग गडावरील वातावरण, देवीच्या डोंगरावर असलेले मंदिर व त्यातून होत असलेले पाण्याचे झिरपणे यामुळे मूर्तीच्या काही भागांत क्षती पोहोचत असल्याचे पुजारी वर्गाच्या लक्षात येवून पुरोहितांनी सन २०१२ –२०१३ मध्येच विश्वस्त मंडळाकडे मूर्ती संवर्धनाची मागणी करीत पाठपुरावा केला होता. त्यानूसार सप्तशृंगी निवासनी देवी ट्रस्टने सर्व पुरातत्व विभाग, आयआयटी पवई यांचे अहवाल व प्रशासकीय परवानगीने पुरातत्व विभागाची मान्यता असलेल्या अंजिक्यतारा कन्सल्टंसी, नाशिक या संस्थेमार्फत संवर्धनाचे काम सुरु केले होते.