रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 19 जुलै 2023 (08:10 IST)

वैयक्तीक हल्ले करुन एखाद्याचे राजकीय जीवन संपवायचे ह्या प्रकाराचा निषेध करतो-जितेंद्र आव्हाड

jitendra awhad
किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे अनेकजण सोमय्यांवर निशाणा साधत आहेत. तसेच, विविध शहरांमध्येही सोमय्यांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अधिवेशनातही सोमय्यांच्या व्हिडियोची चर्चा झाली. यातच आता शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरुन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "राजकारणाचा स्तर प्रचंड खालावला आहे. वैयक्तीक हल्ले करुन एखाद्याचे राजकीय जीवन संपवायचे ह्या प्रकाराचा मी निषेध करतो. त्याचं वैयक्तीक जीवन जेव्हा तुम्ही संपवता; तेव्हा त्याचं घर, दार, त्याची पत्नी, मुले, सुना ह्या सगळ्यांवर त्याचा परीणाम होतो. आपला तो राजकीय शत्रू जरी असेल तरी तो विचारांचा शत्रू आहे. वैयक्तीकरीत्या त्याच्यावर हल्ला करुन त्याचे वैयक्तीक जीवन उध्वस्त करण्याचा अधिकार आपल्याला कोणालाच नाही."
 
"एका व्यक्तीबद्दल जे काही फिरत आहे आणि लोक ज्याच्याबद्दल टाळ्या देत आहेत; हे काही योग्य नाही असं मला वाटतं. थोडीशी संवेदनशीलता राजकारण्यांनी बाळगायला हवी. समाज जीवनामध्ये एखाद्याला उध्वस्त करणं हे फार सोप्प आहे. पण, 30-40 वर्षे देऊन ह्या स्तरावर आलेला असतांना एखाद्याला 5 मिनिटांत उध्वस्त करणं हे मला तरी काही पटत नाही," अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
 
Edited By - Ratnadeep ranshoor