सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 23 डिसेंबर 2021 (08:25 IST)

‘अमृत’संस्थेसाठी बोधचिन्ह व घोषवाक्य स्पर्धा; विजेत्याला एक लाख एकशे एक रूपयांचे पारितोषिक

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) AMRUT संस्थेसाठी बोधचिन्ह (Logo) आणि घोषवाक्य (Tagline) रचना स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील विजेत्याला बक्षीस रक्कम रु. १,००,१०१/- (रुपये एक लाख एकशे एक मात्र) रूपये देण्यात येणार आहे तरी इच्छुकांनी १५ जानेवारी २०२२ पर्यंत [email protected] या ई मेलवरती ईमेल करावा.
 
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), ही संस्था १ ऑक्टोबर २०२१ रोजी  स्थापन करण्यात आली  आहे. या संस्थेमार्फत खुल्या वर्गतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा (EWS) शैक्षणिक उन्नती, विकास आणि आर्थिक विकासाबाबत उपक्रम राबविण्यात येतात. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे करिता अभ्यासक्रम, परिषद, व्याख्याने, चर्चासत्रे हाती घेणे, आयोजित करणे आणि सुलभ करणे आणि पुस्तके, जर्नल्स आणि शोधनिबंध प्रकाशित करणे, स्पर्धात्मक परीक्षांसाठी अभ्यास केंद्रे स्थापन करणे, विविध व्यवसाय, उद्योग विकास इत्यादी क्षेत्रात कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण केंद्रे स्थापन करणे, तरुणांच्या सर्जनशीलतेचा उपयोग करण्यासाठी अमृत ही संस्था काम करते.
 
अमृत या संस्थेसाठी बोधचिन्ह (Logo) आणि घोषवाक्य (Tagline) तयार करताना हा लोगो आणि बोधचिन्ह हे संस्थेची वैशिष्ट्ये आणि उद्दीष्ट दाखविणारा असावा. संकल्पना, थीम आणि प्रतीकात्मक घटकांचे वर्णन करण्यासाठी इंग्रजी अथवा मराठीमध्ये जास्तीत जास्त शंभर शब्द असावेत. बोधचिन्ह व घोषवाक्यासाठी कीवर्ड हा महाराष्ट्र संशोधन, प्रशिक्षण, उन्नती, नवकल्पना, कौशल्ये असा असावा.
 
या स्पर्धेच्या नियम आणि अटी पुढीलप्रमाणे आहेत. प्रवेशिका जमा करण्याची अंतिम तारीख १५ जानेवारी २०२२ आहे.प्रत्येक स्पर्धक फक्त एकदाच प्रवेश नोंदवू शकतो.जर कोणत्याही स्पर्धकाने एकापेक्षा अधिक प्रवेश नोंदवले असतील,तर त्या स्पर्धकाने नोंदविलेल्या शेवटच्या प्रवेशिकेचा विचार केला जाईल. या स्पर्धेसाठी वयोमर्यादा ही कमीतकमी १२ वर्षे आणि त्यावरील वयोगटातील स्पर्धकांना या स्पर्धेत भाग घेता येईल. वैयक्तिक व्यक्ती, लोकांचा वैयक्तिक गट, तज्ज्ञ, व्यावसायिक, कंपनी, खाजगी, सामाजिक संस्था या स्पर्धेत सहभागी होवू शकतात.
 
याबाबतची सविस्तर निकष व माहिती महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर www.maharashtra.gov.in (What’s New) नवीन संदेश मध्ये पाहता येईल. स्पर्धेशी संबंधित सर्व बाबी, शंका किंवा विवादांसाठी या [email protected] वर ई-मेल करावी.