गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 4 फेब्रुवारी 2023 (19:58 IST)

जळगाव येथे महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषद सुरू

भारतात हिंदुंच्या मंदिरांची संख्या लाखात आहे. मंदिरांचे व्यवस्थापन करताना सामाजिक आणि कायदेशीर स्तरावर अनेक अडचणी निर्माण होतात. या शिवाय, मंदिरांच्या व्यवस्थेचे सरकारीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याची दखल घेऊन मंदिरे-देवस्थानांच्या व्यवस्थापनातील प्रतिनिधी, पदाधिकारी यांच्या संघटनचा प्रयत्न 'सनातन' तर्फे करणे सुरू झाले आहे. हिंदू जनजागृती समिती, जळगाव आणि श्री क्षेत्र गणती देवस्थान, पद्मालय यांच्या संयुक्त आयोजनात आजपासून जळगाव येथे दोन दिवसांची महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषद सुरू झाली. या परिषदेत महाराष्ट्रातील ५० वर मंदिर-देवस्थानांचे पदाधिकारी व प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. या निमित्ताने परिषदेच्या उद्घाटन सत्रात अनेक मान्यवरांनी मंदिर व्यवस्थापनांचे संघटन हवे यासह मंदिर व्यवस्थापन अभ्यासक्रमाची रचना करावी अशा दोन महत्त्वपूर्ण सूचना केल्या.
 
परिषद आयोजनाचा हेतू नंदकुमार जाधव यांनी सांगितला. ते म्हणाले, 'मंदिरे ही आजच्या सामाजिक, आरोग्यविषयक आणि मानसिक समस्यांचे निराकरण करण्याची जागा आहे. माणसाला सुदृढ आरोग्य हवे तसेच मानसिक शांती हवी. ती मंदिरांच्या सानिध्यात व देव दर्शनात मिळते. अशा मंदिरांच्या व्यवस्थापनात आता जागा, निधी, संपत्ती, देखभाल, मालकी, पूजाअर्चा, मालमत्ता विषयक अडचणी आहेत. या अडचणी सोडवायला सरकार आणि न्यायालयात वारंवार जावे लागते. इतर समाजातील प्रार्थनास्थळांच्या व्यवस्थेत सरकारी वा इतर हस्तक्षेप नाही. त्यांना कायदेशीर संरक्षणही आहे. तसेच संरक्षण मंदिरे-देवस्थानांनाही मिळावे या मागणीसाठी ही परिषद आहे.'
 
परिषदेचे स्वागताध्यक्ष पद्मालय गणपती मंदिराचे विश्वस्त अशोक जैन होते. ते म्हणाले, 'मंदिरे ही माणसांना जोडतात. धर्मापासून मंदिर वेगळे करता येत नाही. मंदिरांमुळे माणुसकी आज टिकून आहे. मंदिरांची संख्या वाढते आहे. त्यांच्या व्यवस्थापनात गुणात्मक सुधारणा होते आहे. मंदिरांचे सुयोग्य व्यवस्थापन ही काळाची गरज आहे. मंदिरांची परंपरा व पावित्र्य कायम राखून ती श्रद्धा स्थळेच राहावीत. तेथे पर्यटनस्थळे होऊ नयेत. मंदिरांचे संरक्षण आणि व्यवस्थेत बदल ही व्यापक संघटन होण्याची आवश्यकता आहे.'
 
मंदिरांच्या व्यवस्थापन आणि मंदिर निर्माणचा ऐतिहासिक गाढा अभ्यास असलेले रमेश शिंदे यांनी देवालये आणि प्रार्थनास्थळे यातील भेद स्पष्ट केला. ते म्हणाले, 'प्रार्थनास्थळात प्रेषित वा देव असतोच असे नाही. तेथे फक्त प्रार्थना होते. पण देवाच्या देवाची कायम स्थापना असते.  देवालये ही धर्म व संस्कृतीची विद्यालये आहेत. तसेच ती उपचार देणारी औषधालये ही आहेत. भारतात मंदिरांचे अनेक प्रकार आहेत. म्हणून समस्या अधिक आहेत.' रमेश शिंदे यांनी मंदिरांसाठी तयार झालेले कायदे, त्यातील बदल, कायद्यातून प्रार्थना स्थळे कशी वगळली याची सनावळीसह जंत्री दिली. सन १८१७ पासून कायद्यातील बदल ते सांगत होते. सन २०१४ पर्यंत फक्त मंदिरांवर कसे कायद्याचे बंधन राहिले हा विषय त्यांनी समजून दिला. त्यांनीही मंदिरांचे संघटन आणि व्यवस्थापन अभ्यासक्रम हा विषय मांडला. 
नाशिक येथील काळाराम मंदिराचे विश्वस्त महंत सुधीरदास महाराज यांनीही काही सूचना केल्या. प्राचीन काळी मंदिरात वैदिक पाठशाळा भरत. तेथे वेदाध्ययन सोडून इतर व्यवहार ज्ञानाचे शिक्षण सर्वांना दिले जात असे असा दावा त्यांनी केला. मंदिरे ही गावकऱ्यांनी ऊर्जा स्थाने होती असे सांगून महंत सुधीरदास म्हणाले, 'मंदिरांचे संघटन हे एकमेकांच्या प्रगतीसाठी असावे.' देऊळगावराजा येथील बालाजी देवस्थानचे विश्वस्त राजे विजयसिंह जाधव यांनी दोन सूचना केल्या. त्यांनी बालाजी उत्सवात सर्वधर्मसमभावाचा सहभाग व निश्चित जबाबदारी सांगितली. मंदिर सेवेत सर्व धर्मांना सोबत घ्यावे अशी सूचना करीत ते म्हणाले, 'मंदिरासाठी आचार संहिता असावी. त्याचे नियम काटेकोर ठेऊनत्याचे कटाक्षाने पालन करावे.'
 
सर्वांत प्रभावी आणि लक्षवेधी संबोधन ॲड. विष्णु जैन यांनी केले. ते आणि त्यांचे वडील ॲड. हरिशंकर जैन हे काशीचे काशीविश्वनाथ, मथुरेचे कृष्ण जन्मस्थान मुक्तीचा लढा सुप्रीम कोर्टात देत आहेत. त्यांनी न्यायालयीन संघर्षातून समोर आलेले अनेक लक्षवेधी मुद्दे मांडले. मंदिरे ही भारतीय व्यवस्थेतील मदरबोर्ड आहे. तेथून समाजाला ऊर्जा मिळते. हेच मदरबोर्ड करप्ट करायचे काम इस्लामी आक्रमकांना केले. लाखो मंदिरे उध्वस्त करून तेथे मशिदी उभारल्या. मंदिरांचे अवशेष आजही डोळ्यांनी दिसतात. तरीही आताचे मुस्लिम विनाकारण कायदेशीर लढाया करीत आहेत.' हे सांगितल्यानंतर ॲड. जैन यांनी ज्ञानवापी मशिदीत वकील पॅनेलने केलेल्या पाहणीत हिंदू मंदिरांचे अवशेष कसे आढळले याची जंत्री दिली. 'हिंदुंचे आदिदेव महादेव आहेत. लिंग पूजा प्रकृतीची पूजा आहे. म्हणून काशिविश्वनाथ मंदिरात लिंगाची पुनर्स्थापना करणे जरूरी आहे' असेही ते म्हणाले.