शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 22 जुलै 2021 (11:56 IST)

महाराष्ट्र पाऊस: कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात जोरदार पाऊस

गेल्या चोवीस तासांमध्ये रत्नागिरी, कोल्हापूर, अकोला अशा विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. मुसळधार पावसामुळे आपत्ती व्यवस्थापन सतर्क झाले आहे.
 
राज्यात एकूण या ठिकाणी NDRF ची 9 पथके रवाना करण्यात आली आहेत.
 
कोल्हापूर जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी 36 फुटांवर पोहोचली असून अनेक सखल भागात पाणी साठायला सुरुवात झाली आहे.
 
तसेच 77 बंधारे पाण्याखाली गेल्याने जिल्ह्यातील काही गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी म्हणून NDRFला पाचारण करण्यात आले असून दुपारपर्यंत पथक जिल्ह्यात दाखल होणार आहे.
 
काल अकोला जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. मुसळधार पावसामुळं शहरातील वस्त्यांमध्ये पाणी शिरले तर खडकी भागातील न्यू खेताण या परिसरातील 30 घरं पाण्याखाली आले आहे.
 
स्थानिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अकोला जिल्ह्यात गेल्या 24 तासात 202.9 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे.
 
पावसामुळे अकोला जिल्ह्यातील शेतीचही मोठं नुकसान झालं आहे. शेतांमध्ये पाणी साचले आहे, शेती खरडून निघाली आहे.
 
पूर परिस्थितीमुळे जिल्ह्यातील बहुतांश भागातील बत्ती गुल आहे. काल रात्रीपासून बचाव पथक तैनात आहे. तर नागपूरहून विशेष बचाव पथकाला पाचारण करण्यात आलं आहे.
 
संततधार पावसाने नांदेडच्या सहस्त्रकुंड इथल्या धबधब्याला रौद्र रूप प्राप्त झालं आहे. सध्या नांदेड, हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे.
 
त्यामुळे पैनगंगा नदीचे पात्र दुथडी भरून वाहतेय, त्यामुळे सहस्रकुंड धबधब्याचे असे दुर्मिळ दृश्य आज सकाळपासून पाहायला मिळत आहे.
 
महाबळेश्वर तालुक्याला पावसाचा तडाखा
मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा महाबळेश्वर तालुक्याला बसला असून तालुक्यातील जनजीवन आता विस्कळीत होऊ लागले आहे.
 
मुसळधार पावसाने महाबळेश्वरचा वेण्णा तलाव काल पासूनच ओसंडून वाहू लागल्याने तलावाचे सर्व पाणी बाहेर रस्त्यावर आल्याने काल काही काळ महाबळेश्वर कडून पाचगणीकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती नंतर ही वाहतूक संथगतीने सुरू आहे.
 
महाबळेश्वर तालुक्याच्या आजूबाजूला असणाऱ्या गावांमध्येसुद्धा मोठ्या प्रमाणात शेतांमध्ये पाणी शिरू लागले आहे.
 
प्रतापगड भागातसुद्धा पावसाचा जोर अधिक असल्याने या भागातील चतुरबेट पूल आता पाण्याखाली गेला आहे. हा पूल पाण्याखाली गेल्याने जवळपास 15 गावांचा संपर्क आता तुटला आहे.