सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 11 जुलै 2024 (08:37 IST)

या तारखेला महिलांच्या खात्यात येतील लाडकी बहीण योजनेचे पैसे

mukhyamantri Ladki Bahin Yojana
महाराष्ट्र सरकारने नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. याबाबत राज्यातील महिलांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. योजनेचे अर्ज भरण्यासाठी सेतू केंद्र आणि अंगणवाडी केंद्रांवर महिलांची गर्दी होत आहे. महिला अर्ज करत आहेत पण या योजनेचे पैसे त्यांच्या खात्यात कधी येणार असा प्रश्न त्यांच्या मनात आहे. आता या तारखेबाबत एक बातमी समोर येत आहे.
 
राज्य सरकारने राज्यभरातील महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणन योजना’ सुरू केली आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून या योजनेची प्रत्येक स्तरावर जोरदार चर्चा होत आहे. या योजनेंतर्गत पात्र महिलांना राज्य सरकार दरमहा 1500 रुपये देणार आहे. 1 जुलै 2024 पासून संपूर्ण राज्यात या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. तसेच या योजनेचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात कधी येणार? याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न आहेत. मात्र आता याबाबतची उत्सुकता संपणार असून, राज्य सरकारने पात्र महिलांच्या खात्यावर योजनेचे पैसे जमा करण्याची तारीख जाहीर केली आहे.
 
योजनेचे पैसे 15 ऑगस्टला येतील
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणन योजना’ राज्याच्या ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक मदत करेल. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यभरातील शासकीय कार्यालयांमध्ये मोठी गर्दी होत आहे. राज्य सरकार जुलै 2024 ची रक्कम स्वातंत्र्य दिनानिमित्त (15 ऑगस्ट) राज्यातील पात्र महिलांच्या खात्यात जमा करणार आहे.
 
अंतिम यादी 1 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होईल
राज्य सरकारने 1 जुलै रोजी महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना’ सुरू केली. त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जुलैपर्यंत होती. त्यानंतर त्यास मुदतवाढ देण्यात आली असून अर्ज करण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. आतापर्यंत महिलांचे अर्ज दाखल झाले असून, त्यांची तात्पुरती यादी 16 जुलै रोजी प्रसिद्ध होणार असून अंतिम यादी 1 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार आहे.
 
प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला पैसे भरले जातील
मिळालेल्या माहितीनुसार, 14 ऑगस्टपासून पात्र महिलांच्या खात्यात योजनेची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. साधारणपणे 15 ऑगस्टपर्यंत राज्यातील सर्व महिलांना ही रक्कम मिळेल. यापुढे या योजनेचे 1500 रुपये प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केले जातील, असेही राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.