सर्व महापालिकेत4 सदस्यांचा एक प्रभाग करा : प्रताप सरनाईक
महाविकास आघाडी सरकारने मुंबई महापालिका वगळता अन्य महापालिकेत त्रिसदस्यीय प्रभाग पद्धती जाहीर केली होती. मात्र, राज्यातील सर्व महापालिकांमध्ये चार सदस्यांचा एक प्रभाग करावा, असं पत्र आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आहे.
पत्रात नक्की काय म्हटलंय?
महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी आपल्या सोयीनुसार तीन नगरसेवकांची प्रभाग रचना केली असून निवडणूक आयोगाने ओ.बी.सी. आरक्षण नसताना देखील प्रभाग रचना प्रसिद्ध करून प्रारूप आराखडा प्रसिद्ध केला आहे. पण नुकत्याच झालेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ओ.बी.सी. आरक्षणासहित पुढील निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
आपल्या सरकारने युती सरकारच्या कार्यकाळात असलेल्या चार सदस्यांच्या प्रभाग रचनेनुसार पुढील निवडणुका घेतल्यास त्याचा फायदा समाजातील सर्व घटकांना होऊन जनतेची कामे करण्यास सुलभ होईल. तरी आपण येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील सर्व महापालिकांमध्ये चार सदस्यांच्या प्रभाग रचना करण्याचा असलेला विषय मंजूर करून येत्या अधिवेशनामध्ये त्याची अंतिम मंजूरी घ्यावी, असं पत्रात म्हटलं आहे.