शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 (17:29 IST)

यशवंतराव चव्हाण यांचे कार्य प्रेरणादायी – अॅड. मयूर जाधव

यशवंतराव चव्हाण हे एक दूरदृष्टी असलेले नेते होते. त्यांनी खेड्यापाड्यातील सामान्य माणसाचा विकास कसा होईल याला गती देण्याचे काम केले. देशावर वेळोवेळी आलेल्या संकटांच्यावेळी ते मदतीला धावून आले. त्यांचे कणखर नेतृत्व आणि कौशल्यपूर्ण कार्यपद्धती महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला आजही प्रेरणादायी असून देशाच्या जडण घडणीत त्यांचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन  अॅड. मयूर जाधव यांनी केले.  
 
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे हे होते. यावेळी व्यासपीठावर वित्त अधिकारी मगन पाटील, ग्रंथालय व माहितीस्रोत केंद्राचे प्रमुख डॉ. मधुकर शेवाळे उपस्थित होते.  
 
अॅड. मयूर जाधव म्हणाले, मराठी भाषिकांच्या राज्याची निर्मिती करण्यात यशवंतराव चव्हाण यांची भूमिका महत्त्वाची राहिली. त्यांनी सहकार चळवळ वाढीस लावण्यासाठी दिलेले योगदान अतिशय मोठे आहे. याशिवाय व्यक्ती आणि त्यांचे व्यक्तिमत्वही यशवंतराव चव्हाणांनी त्यात्या पातळीवर घडविले. देश आर्थिक संकटात असताना अर्थ विभागाला न्याय देण्याचे कामही त्यांनी अतिशय अभ्यासपूर्वक केले. राजकीय क्षेत्रात वावरत असताना त्यांनी वाचनात मात्र कधीही खंड पडू दिला नाही. वाचन हे मोठे व्यसन त्यांना जडल्याचे सांगून अॅड. जाधव  यांनी यशवंतराव चव्हाणांच्या अनेक आठवणींना या वेळी उजाळा दिला.
 
कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे अध्यक्षीय भाषणात म्हणाले, यशवंतरावांचे शैक्षणिक व सामाजिक योगदान डोंगराएवढे आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीचे ते शिल्पकार असून, कृषी औद्योगिक धोरणाचे प्रणेते म्हणून त्यांनी केलेले कार्य महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला ज्ञात आहे. माणुसकी जपणारे ते थोर राजकारणी होते. कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण स्वैरपणे भटकंती करणारे बहुआयामी व्यक्तिमत्व होते. एक सुसंस्कृत, धोरणी, प्रगल्भ, व्यासंगी राजकारणी म्हणून त्यांची कारकीर्द राहिली. समाजातील सर्व घटकांचा विकास साधून हित जपणारा आधारस्तंभ असे यशवंतराव चव्हाण यांचे वर्णन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विद्यापीठाचे प्रभारी जनसंपर्क प्रमुख संतोष साबळे यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांतील शिक्षक, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.