शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 23 एप्रिल 2022 (09:36 IST)

मंत्रीच खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन सरकारी पैशांची उधळपट्टी करताय’ प्रवीण दरेकर यांचा घाणाघात

pravin darekar
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री हे खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन सरकारच्या पैशांची उधळपट्टी करीत असल्याचा घाणाघात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. आज ते नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी माध्यमांशी विविध प्रश्नांवर संवाद साधला.दरेकर म्हणाले की, मंत्र्यांकडून खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याची वृत्ती आणि सरकारी पैशाची उधळपट्टी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थांबवावी. ज्या मंत्र्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनी हॉस्पिटलची बिलं घेऊ नयेत. मंत्र्यांनी सर्व बिलं परत करून एक चांगला पायंडा पाडावा, असे आवाहनही त्यांनी केले.
 
राज्यातील लोडशेडिंगच्या प्रश्नावर ते म्हणाले की, वीज देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली राज्य सरकारने भारनियमन सुरू केले आहे. – राज्याच्या बेशिस्त कारभारामुळे ऐन उन्हाळ्यात भारनियमन केले जात आहे. फडणवीस सरकारच्या काळात कधीही भारनियमन झाले नाही. आपले अपयश झाकण्यासाठी केंद्रावर ढकलायचे असे राज्य सरकारचे धोरण आहे. कोळशाचं खापर केंद्रावर फोडून काहीच होणार नाही. केंद्राकडून राज्याला अतिरिक्त कोळसा दिला जातोय. स्वतः वीजनिर्मितीबाबत राज्य सरकार बेफिकीर आहे. त्यात सर्वसामान्य जनता होरपळते आहे. शेतकऱ्यांना, ग्राहकांना वीज देण्यात सरकार अपयशी ठरत आहे. सरकारची पूर्ण पत संपली आहे. ग्राहकांकडून महावितरणने वाढीव सुरक्षा अनामत रक्कम घेऊ नये. राज्य सरकारमध्ये कुणाचा कुणाला समन्वय नाही. अर्थमंत्री हे ऊर्जाखाते काँग्रेसकडे आहे म्हणून त्यांना निधी देत नाहीत की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्यातील भारनियमन रद्द करण्याच्या मागणीसाठी भाजपतर्फे राज्यभर आंदोलन करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेबद्दल दरेकर म्हणाले की,  राज ठाकरे यांना सभा घेण्याचा अधिकार आहे. सभेला परवानगी द्यायची नाही, ही सरकारची दंडेलशाही आहे. हे खपवून घेतले जाणार नाही. राज ठाकरे यांच्या भोंग्यांविषयीच्या भूमिकेला भाजपचे समर्थन आहे. जिथे गरज पडेल तिथे भाजपही सहभागी होईल, असे त्यांनी सांगितले.