मनसेचे पदाधिकारी प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी जाऊन त्यांच्या घरावर मनसेचा झेंडा फडकवणार
नाशिकची सूत्रे मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत.ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पक्ष बांधणीसाठी पदाधिकार्यांना कार्यक्रम देण्यात आला असून, त्यानुसार आता जिथे महाराष्ट्र सैनिक तिथे मनसेचा झेंडा फडकावण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत मनसेचे पदाधिकारी आता प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी जाऊन त्यांच्या घरावर मनसेचा झेंडा फडकवणार आहेत.
या अभियानाविषयी मनसेच्या राजगड येथील पक्ष कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. मनसेने आता पुन्हा पक्ष संघटनेवर लक्ष केंद्रीत केले आहे. नाशिकची जबाबदारी मनसे नेते अमित ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. अमित ठाकरे यांनी आता दर आठवड्याला नाशिकमध्ये तळ ठोकत पक्ष बांधणीवर लक्ष केंद्रीत केले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार आता पक्षात शाखाध्यक्षांची नियुक्ती करण्यात येणार आहे. पक्षात यापुढे शाखाध्यक्ष पदाला महत्वाचे स्थान राहणार आहे.त्यानुसार ३१ प्रभागांसाठी शाखाध्यक्षांची नियुक्ती केली जाणार आहे.त्यासाठी ७५० इच्छुकांनी मुलाखती दिल्या.मनसेला तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त करत जेथे महाराष्ट्र सैनिक तेथे मनसेचा झेंडा हा उपक्रम राबविण्याचा निर्णय यावेळी जाहीर करण्यात आला.