खासदार संभाजीराजे यांच्या त्या पोस्टने चर्चांना उधाण; आता पुढे काय होणार?
राज्यसभेची खासदारकीची निवडणूक अपक्ष लढविण्याची घोषणा करणाऱ्या खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज एक खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी आज एक पोस्ट सोशल माध्यमात शेअर केली आहे. त्याचे विविध अर्थ काढले जात असून यापुढील त्यांचे पाऊल काय असणार या चर्चांना उधाण आले आहे.
छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होत खासदार संभाजीराजे यांनी आता रणशिंग फुंकले आहे, असे म्हटले जाते. तुमच्या नजरेतील स्वराज्य मला घडवायचे आहे असे उद्गार त्यांनी काढले असून यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. महाराष्ट्रातील जागांसाठी राज्यसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. त्यातच संभाजीराजे यांना शिवसेनेत प्रवेश करत असाल, तर उमेदवारी देऊ अशी अट, शिवसेना पक्षाने घातली, परंतु त्यांनी शिवसेनेची ऑफर नाकारत स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे.
१० जूनला राज्यसभेच्या जागांसाठी मतदान होत आहे, त्यातच भाजपने देखील राज्यसभेसाठी तिसरा उमेदवार उभे करण्याचे ठरविलेले दिसते. चंद्रकांत पाटील यांनी याबाबत वक्तव्य केले आहे. संभाजी राजे यांनी स्वराज्य नावाची नवी संघटना स्थापन केल्याने भाजपाकडून देखील त्यांना पाठिंबा मिळण्याची शक्यता मावळली आहे.
मात्र संभाजी राजे म्हणाले की, मी आतापर्यंत समाजाच्या हितासाठी लढलो आहे. पण, गेल्या काही वर्षांपासून मला खासदारकी मिळाली. त्यामध्ये अनेक कामे करता आली. समाजासाठी कामे करायची असेल तर सत्ता महत्वाची आहे. त्यामुळे मी येत्या काही दिवसांत होणारी राज्यसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. पण, ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार आहे, असे छत्रपती संभाजी राजे यांनी जाहीर केले आहे.
या सहा वर्षात अनेक कामे केली. व्यापक दृष्टीकोणातून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दिल्लीत सुरू केली. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती कोणी साजरी करण्यास सुरूवात केली. शिवाराज्यभिषेक सोहळा अधिक व्यापक केला. संसदेत शाहू महाराज आणि छत्रपतींच्या विचारावर बोललो. माझ्यामुळे राष्ट्रपती रायगडावर आले, असेही छत्रपती संभाजी महाराज म्हणाले. गेल्या काही दिवसात संभाजी राजे हे मराठा आरक्षण प्रश्न असो की, राजगडावरील सोयी सुविधा यासंदर्भात राज्यातील राजकारणात लक्ष घालत असल्याचे दिसले तरी त्यांना दिल्लीत जाण्याची इच्छा आहे त्यामुळे ते खासदारकीची निवडणूक लढवीत असल्याचे म्हटले जाते.