गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 2 डिसेंबर 2021 (21:30 IST)

अवकाळी पावसाचा फटका लोकसेवा आयोगाच्या परीक्षांवर

राज्यात अवकाळी पावसाचा फटका आता लोकसेवा आयोगाच्या परीक्षांवरही बसला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ठरवलेल्या वेळेतील पोलीस उपनिरीक्षकसाठीच्या शारीरिक चाचणी आणि मुलाखतींचा कार्यक्रम पुढे ढकलला आहे. मुंबईसह संपुर्ण राज्यात अवकाळी पाऊस पडतो आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे गैरसोय झाली आहे. यामुळे या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या पत्रकामध्ये उपनिरीक्षकसाठीच्या पुणे केंद्रावरील दोन दिवसांच्या आणि कोल्हापूर केंद्रावरील एक दिवसाच्या शारीरिक चाचणी आणि मुलाखतीचा कार्यक्रम पुढे ढकलला असल्याचे जाहीर केले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकामध्ये म्हटलं आहे की, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०१९(पोलीस उपनिरीक्षक)च्या लेखी परीक्षा ३ ऑगस्ट २०२१ रोजी जाहीर करण्यात आल्या आहेत. सुधारित निकालाच्या आधारे शारीरिक चाचणीकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांचा प्रथम टप्प्यातील कोल्हापूर, पुणे व नाशिक या केंद्रांवरील शारीरिक चाचणी व मुलाखतीचा कार्यक्रम संदर्भित दिनांक २१ ऑक्टोबर २०२१ रोजीच्या परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात आला आहे.
तसेच पुणे व कोल्हापूर येथे होत असलेल्या अवकाळी पावसामुळे पुणे केंद्रावरील दिनांक १ व २ डिसेंबर या कालावधीतील तर कोल्हापूर केंद्रावरील २ डिसेंबरच्या शारीरिक चाचणी आण मुलाखतीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तसेच कोल्हापूर केंद्रावरील दिनांक २ डिसेंबरचा अपिलाचा कार्यक्रमही पुढे ढकलण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे. या कालावधीतील उमेदवारांचा शारीरिक चाचणी व मुलाखतीचा तसेच अपिलाचा सुधारित कार्यक्रम स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सांगण्यात आले आहे.