Last Modified मंगळवार, 14 जानेवारी 2020 (17:55 IST)
मुंबईत एका टॅक्सीचालकावर रेल्वे सुरक्षा दलाच्या कॉन्स्टेबलने दुष्कर्म केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वेश्यावस्तीत जाण्यासाठी आरपीएफ कॉन्स्टेबलने टॅक्सी चालकाला विचारणा केली. पण, त्याने नकार दिल्यामुळे आरोपी कॉन्स्टेबलने टॅक्सीचालकाला बेदम मारहाण केली आणि त्याला रेल्वेच्या हद्दीतील निर्जनस्थळी नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी पीडित टॅक्सीचालक छत्रपती शिवाजी टर्मिनस जवळ डिमेलो रस्त्यावर बेंचवर आराम करत होता. त्यावेळी आरोपी कॉन्स्टेबल अमित धांकड तेथे आला आणि त्याने टॅक्सी ग्रॅण्ट रोड इथल्या वेश्यावस्तीत नेण्यास विचारले. मात्र तिकडे जाण्यास टॅक्सीचालकाने नकार दिला. याचा राग आल्यामुळे आरोपी अमितने टॅक्सीचालकाला बेदम मारहाण केली. त्याला रेल्वेच्या हद्दीतील निर्जनस्थळी नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. बलात्कारानंतर आरोपीने पीडित टॅक्सीचालकाकडील पैसे व टॅक्सीची चावीही हिसकावून घेतली होती. या घटनेनंतर पीडित टॅक्सी चालकाने पोलीस स्टेशन गाठून घडलेला प्रसंग सांगितला. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करुन आरोपी कॉन्स्टेबलला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे. या प्रकरणी माता रमाबाई आंबेडकर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रेल्वे प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपी कॉन्स्टेबल अमितला तडकाफडकी निलंबित केले आहे.