शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 25 ऑक्टोबर 2023 (08:51 IST)

नागपूर:लक्षावधी अनुयायांच्या साक्षीने दीक्षाभूमीवर २०० कोटींच्या ई-भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न

eknath shinde
नागपूरच्या दीक्षाभूमीवर 67 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जमलेल्या अलोट जनसागराच्या साक्षीने राज्य शासनाने 200 कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ केला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईन संदेश देऊन तर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून या शुभ कार्याची आज मुहूर्तमेढ रोवली.
 
नागपूर येथे 67व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पर्वावर ही घोषणा करण्यात आली. यासाठी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला अधिकृत एजन्सी म्हणून मान्यता देण्यात आली आहे. दीक्षाभूमीच्या 22.80 एकर परिसराचा विकास जागतिक दर्जाचा करण्यात येणार आहे. आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत इलेक्ट्रॉनिक्स कळ दाबत या विकास कार्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी राज्य शासनातर्फे ७० कोटी रुपयांच्या धनदेशाचे वितरणही करण्यात आले.
 
यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, प्रमुख पाहुणे डॉ.आफिनिता चाई चाना, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खा. कृपाल तुमाने, पोलीस आयुक्त अमीतेश कुमार, नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर,महानगरपालिका आयुक्त डॉ.अभिजित चौधरी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे सदस्य डॉ.कमलाताई रा.गवई, अॅड. मा.मा. येवले, डॉ. सुधीर फुलझेले, अॅड आनंद फुलझेले, एन.आर. सुटे, डॉ.राजेंद्र गवई, डी.जी.दाभाडे, विलास गजघाटे, डॉ. प्रदीप आगलावे, डॉ. चंद्रशेखर मेश्राम,भन्ते नाग दीपांकर,प्रादेशिक उपाआयुक्त सिद्धार्थ गायकवाड, समाज कल्याण उपायुक्त सुकेशिनी तेलगोटे यांची उपस्थिती होती.
 
दीक्षाभूमीच्या विकास कामाचे ई-भूमिपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संदेश प्रक्षेपित करण्यात आला. 200 कोटींचे विकास कार्य दीक्षाभूमीवर लवकरच पूर्ण होईल. दीक्षाभूमी व चैत्यभूमीवरील विकास कार्यासाठी राज्य शासन कटीबद्ध असून सर्व कामे जागतिक मानांकनाची व गतीने करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या व्हीडीओ शुभेच्छा संदेशात स्पष्ट केले.
 
नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत दीक्षाभूमीवर जागतिक दर्जाच्या स्तरावरील कामे होतील. यामध्ये या संपूर्ण 22.80 एकर परिसराचा कायापालट केला जाईल, आज 70 कोटींचा धनादेश दिला जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी संबोधित करताना, नागपूर हे शहर देशाच्या अतूट श्रध्देचे केंद्र आहे. त्यामुळे कोणत्याही निमंत्रणाशिवाय, कोणीही बोलवल्याशिवाय या ठिकाणी लाखोचा जनसमुदाय बाबासाहेबांच्या श्रध्देपोटी एकत्र येतो. त्यामुळे या ठिकाणी जे काही निर्माण होईल, जे काही बनेल ते भव्य असेल. ते जागतिक दर्जाचे असेल. जगातील बौद्ध धर्माचे विचारक ज्यावेळी या ठिकाणी महामानवा पुढे नतमस्तक व्हायला येईल त्यावेळी त्यांना या ठिकाणाच्या सोयीसुविधा जागतिक दर्जाच्या मिळतील. दीक्षाभूमीचा विकास हा माझ्यासाठी भावनिक विषय आहे. दीक्षाभूमी माझ्या मतदार संघात आहे. त्यामुळे २०० कोटींचा हा विकास जागतिक दर्जाचा होईल, असे स्पष्ट केले.
 
यावेळी त्यांनी दीक्षाभूमीच्या विकासाचे हे दुसरे पर्व असल्याचे घोषित केले. यापूर्वी मुख्यमंत्री असताना दीक्षाभूमीच्या विकासाचे झपाट्याने काम सुरू झाले होते. मात्र मधल्या काळात त्याला अडथळा आला.आता हा अडथळा दूर झाला असून लवकरच कामे पूर्णत्वास जाईल असे त्यांनी सांगितले.
 
हे राज्य बाबासाहेबांच्या वैचारिक वारश्याला पुढे नेणारे असून लंडन मधील बाबासाहेबांच्या घराचे स्मारकात रूपांतर असो, जापान मधील विद्यापीठाच्या पुतळ्यांचे अनावरण असो, की इंदू मिलच्या विकासाचे कार्य असो. बाबासाहेबांच्या विचाराप्रमाणे सर्व निर्मिती भव्य -दिव्य असेल व पुढील वर्षा अखेरपर्यंत इंदुमिल येथील बाबासाहेबांचे जागतिक दर्जाचे स्मारक पूर्ण होईल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
 
Edited By -  Ratnadeep ranshoor