गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 29 ऑगस्ट 2017 (15:53 IST)

'नायगावचा राजा' पाहताना भाविकांना मिळते शिर्डीचे भव्य दर्शन

गणेशोत्सवाची धामधूम सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. विशेष करून, या दिवसांमध्ये विविध सार्वजनिक गणेश मंडळांनी उभारलेले आकर्षक देखावे, भाविकांचे लक्षवेधून घेणारी असतात.  मुंबईतील दादर नायगाव (पूर्व) येथील स्प्रिंग मिल कंपाउंड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात अशीच एक लक्षवेधी सजावट केली आहे. व तसेच १६ फुटाचा नयनरम्य असा बाप्पा विराजमान झाला आहे. 
 
'नायगावचा राजा' म्हणून प्रचलित असणाऱ्या या मंडळाचे यंदा ६१ वे वर्ष असून, साई समाधी शताब्दी वर्षानिमित्त 'शिर्डी साई बाबा मंदिराची भव्य प्रतिकृती इथे उभारण्यात आली आहे. विशेष म्हणजे, साई मंदिराप्रमाणे काकड आरती, साई सत्यनारायण, पालखी सोहळा, साई चरित्र पारायण पठण तसेच विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजनदेखील या दिवसात केले जात आहे. 
शिर्डीचे प्रतिस्वरूप असल्यामुळे, साईबाबांचा गाभारा भाविकांचे डोळे दिपवून टाकतो. या सजावटीसाठी संपूर्ण एक महिना लागला असल्याची माहिती मंडळाचे सचिव संतोष गुरव आणि अध्यक्ष्य कालिदास कोळंबकर यांनी दिली. हा देखावा बनवताना रबर व फायबर शिट्टचा वापर करण्यात आला असून, त्यासाठी दररोज ३० ते ३५ लोक काम करत होती. यापूर्वी या मंडळाने तुळजापूर, जेजुरी, पंढरपूर यांसारखे धार्मिकस्थळे आणि रायगड, मैसूर महलसारख्या ऐतिहासिक देखाव्यांच्या प्रतिकृती उभारल्या होत्या. 'विविध कारणांमुळे लोकांना धार्मिक देवस्थानचे दर्शन घेता येत नाही, अश्या सर्व भाविकांच्या इच्छापुर्ततेसाठी आम्ही दरवर्षी विविध धार्मिकस्थळांचे प्रतिरूप उभारत असतो. यंदा आम्ही शिर्डी देवस्थानचे प्रतिस्वरूप उभारले असून, साई भक्त मोठ्या गर्दीने मंडळाला भेट देत असल्याचे, मंडळाचे अध्यक्ष कालिदास कोळंबकर पुढे सांगतात.