बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 3 मे 2022 (14:28 IST)

रिक्षातून घाबरून उडी मारल्याने नववीच्या मुलीचा जागीच मृत्यू

सिन्नर – ठाणगाव रोडवर आटकवडे शिवारात चालत्या रिक्षातून धाबरून उडी मारल्याने मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. या अपघातात एक चिमुकली गंभीर जखमी झाल्याची घटना सकाळच्या सुमारास घडली आहे. या अपघातात गायत्री अशोक चकणे (१४) रा. वडगाव पिंगळा हल्ली मुक्काम आटकवडे हिचा मृत्यू झाला. तर पाचवीती शिकत असलेली सायली भगवान आव्हाड (११) रा. आटकवडे ही गंभीर जखमी झाली.
 
डूबेरे येथील जनता विद्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त झेंडावंदन व गुणपत्रिका घेण्यासाठी गायत्री व सायली या शाळेत गेल्या होत्या. गुणपत्रिका घेऊन घरी येण्यासाठी त्यांनी डूबेरे येथून सिन्नरकडे कोंबड्या घेऊन जाणाऱ्या समीर अहमद शेख रा. डुबेरे यांच्या अॅपे रिक्षाला हात देऊन त्या पाठीमागे बसल्या. रिक्षा आटकवडे शिवारात आली असता रिक्षाचालकाला सदर मुलींना तेथे उतरून देण्याचे लक्षात न राहिल्याने तो सरळ चालू लागला. पाठीमागे बसलेल्या मुलींनी त्याला जोरजोरात हाक मारून रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, रिक्षाचालकाला मुलींचा आवाज ऐकू आला नाही. मुलींचा आरडाओरडा एकूण रस्त्याने जाणाऱ्या वाहनधारकांनीही त्यास थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो जोरात पुढे चालू लागला. रिक्षा न थांबल्याने दोन्ही मुली घाबरल्या. यावेळी गायत्री चालत्या रिक्षातून रस्त्यावर उडी घेतली. तीला बघून सायलीनेही रिक्षातून उडी घेतली. मात्र, रिक्षा जोरात असल्याने गायत्रीने उडी घेताच तिच्या डोक्याला जबर मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर सायलीच्या डोक्याला व हाताला मार लागून ती गंभीर जखमी झाली. या घटनेमुळे वडगाव पिंगळा व आटकवडे गावात शोककळा पसरली.