शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 फेब्रुवारी 2022 (20:51 IST)

नितेश राणे : संतोष परब हल्ला प्रकरणी 18 फेब्रुवारीपर्यंत कोठडी, नेमकं प्रकरण काय आहे?

शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी कणकवलीचे आमदार नितेश राणे यांना आता 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
 
आधी त्यांना 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. ती संपल्यानंतर राणे यांची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी पोलिसांनी केली होती. पण कोर्टानं त्यांना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
 
आता नितेश राणे यांच्या जामिनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल करणार असल्याची माहिती राणेंचे वकील संग्राम देसाई आणि सतिश माने-शिंदे यांनी दिली आहे.
 
नितेश राणे 2 फेब्रुवारीला न्यायालयासमोर शरण आले होते.
 
न्यायालयाने दिलेल्या निकालाचा मी आदर करतो. सरेंडर करण्यासाठी मी न्यायालयासमोर जातोय, असं म्हणत भाजपा नेते नितेश राणे कणकवलीच्या दिवाणी न्यायालयात हजर झाले होते.
 
संतोष परब हल्ला प्रकरण नेमकं काय आहे?
संतोष परब हे सिंधुदुर्गच्या कणकवली तालुक्यातले शिवसैनिक आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ते शिवसेनेच्या सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख होते.
 
18 डिसेंबरला दुचाकीवरून जात असताना आपल्यावर हल्ला झाल्याचा आरोप संतोष परब यांनी केला होता.
एका गाडीनं आपल्याला आधी धडक मारली, त्यानंतर गाडीतून उतरलेल्या व्यक्तीनं चाकूनं हल्ला केला. त्यानंतर हल्लेखोराने नीतेश राणेंना कळवायला पाहिजे, असा उल्लेख केल्याचं संतोष परब यांनी एफआयआरमध्ये म्हटलं आहे.
 
याप्रकरणी पोलीसांनी मुख्य आरोपी सचिन सातपुतेसह चार जणांना अटक केली. त्यानंतर नितेश राणे यांचीही पोलीसांनी चौकशी केली. पण नितेश यांनी आपल्यावरचे आरोप साफ नाकारले तसंच अटकपूर्व जामिनासाठी सिंधुदुर्गातील जिल्हा न्यायालय, उच्च न्यायलय आणि सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला होता. पण सर्वत्र त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला.
 
याविषयी सिंधुदुर्गातले ज्येष्ठ पत्रकार सांगतात की "आदित्य ठाकरेंचं वाढतं महत्त्व हा मुद्दा आहेच, पण सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची ही निवडणूकही प्रतिष्ठेची बनली होती. इथे राणेंच्या भाजपविरोधात महाविकास आघाडी एकत्रित उभी होती.
 
या निवडणुकीचे पडसाद सिंधुदुर्गातल्या आगामी जिल्हा परिषद निवडणुकीतही उमटू शकतात याची सर्व पक्षांना कल्पना आहे. शिवसेना हा राणेंसाठी टीआरपी आहे आणि राणे हा शिवसेनेसाठी टीआरपी आहे. कोकणात वर्चस्व दाखवायचं असेल, तर एकमेकांविरोधात प्रखरपणे उभं राहणं दोघांसाठीही गरजेचं आहे."
 
कोर्टात काय घडलं होतं?
नितेश राणे हे गुन्हा घडला त्या ठिकाणी ना हजर होते, ना त्या भागाच्या दृष्टीक्षेपात होते. शिवाय ज्या दिवशी हल्ला झाला त्या 18 डिसेंबर पासून 26 डिसेंबर पर्यंत नितेश राणे यांनी कणकवली पोलीस स्टेशनला जाऊन पोलीसांच्या चौकशीला उत्तरेही दिली आहेत, असं राणेंच्या वकिलांनी कोर्टात म्हटलं होतं.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार आरोपी सचिन सातपुते याने नितेश राणे यांच्या संगनमताने या गुन्ह्याचा कट रचला आणि नितेश राणे यांनी फिर्यादीचा फोटो सातपुते यांना दिला. ती जागा सातपुते याने दाखवली आहे आणि आणि त्या जागेचा पंचनामा पोलिसांनी केलेला आहे.
 
शिवाय नितेश राणे आणि आरोपी सचिन सातपुते यांचा एकत्र फोटोही पोलिसांनी रिमांड रिपोर्टच्या कागदपत्रात जोडलेला आहे .
 
अशा वेळी आता नितेश राणे यांच्याकडून हस्तगत करण्यासारखे काहीही उरत नाही. तसंच जे काही कॉल डिटेल्स आवश्यक आहेत ते डिटेल्स मोबाईल कंपन्यांच्या सर्व्हिस प्रोवायडर कडून पोलीस घेऊ शकतात, असा दावा राणेंच्या वकिलांनी केला आहे.