शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: ​मुंबई , शनिवार, 4 मार्च 2017 (09:47 IST)

डिसेंबर २०१८ पूर्वी पनवेल - इंदापूर मार्गाचे काम पूर्ण होणार - गडकरी ​

गोवा महामार्गाच्या पनवेल - इंदापूर या ८४ कि. मी. मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम काँग्रेसच्या राजवटीत चालू झाले होते व तेव्हापासूनच ते रखडलेले आहे. सध्या कामाने पुन्हा वेग घेतला असून ४७ टक्के काम पूर्ण झाले आहे. महिनाभरात हे काम ५० टक्क्यांपर्यंत गेल्यानंतर बँकांच्या माध्यमातून सरकारकडून या कामासाठी ५४० कोटी रुपयांचा निधी देण्याचे निश्चित करण्यात आले असून डिसेंबर २०१८ पर्यंत चौपदरीकरणाचे काम  पूर्ण होऊन हा मार्ग वाहतुकीस खुला झाला असेल असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागोठण्यात व्यक्त केला. 
 
रायगड दौऱ्यात  गडकरी  रेवदंड्याहून हेलिकॉप्टरद्वारे महाड येथील सावित्री नदीवरील नवीन पुलाच्या बांधकामाची हवाई पाहणी करून नागोठणे रिलायन्सच्या हेलीपॅडवर उतरले व मोटारीने मुंबई - गोवा महामार्गावरील कामत गोविंदा हॉटेलमध्ये आले असता, त्यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महामार्गाच्या इंदापूर ते झाराप या दुसऱ्या टप्प्यातील कामाच्या निविदा काढण्यात आल्या असून कशेडी घाट वगळता उर्वरीत कामाला पुढील दोन महिन्यात प्रारंभ केला जाईल. मुंबई - गोवा महामार्गाच्या पूर्ण कामासाठी १२ हजार कोटी रुपयांची तरतूद सुद्धा केली आहे. गतवर्षी २ ऑगष्टला महाडच्या सावित्री नदीवरील भीषण दुर्घटनेनंतर या ठिकाणी नवीन पुलाचे काम प्रगतीपथावर असून त्याची आताच पाहणी करून आलो आहे. ६ महिन्यात या पुलाचे बांधकाम पूर्ण होईल असे मी त्यावेळी आश्वासन दिले होते व प्रत्यक्षात ते आता साकार होत असून ३० जूनपर्यंत हा पूल वाहतुकीस खुला झालेला असा विश्वास ना. गडकरी यांनी व्यक्त केला. या महामार्गावर अनेक इंग्रजकालीन पूल असून ते बाद करून त्या ठिकाणी नवीन पूल बांधण्याचे शासनाचे धोरण असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. महाड ते रायगड या २५ किलोमीटरच्या मार्गासाठी २०० कोटी, अलिबाग - वडखळ मार्गासाठी १ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे व ही कामे लवकरच चालू केली जातील असे त्यांनी यावेळी सांगितले. 
 
मुंबई - गोवा महामार्गालगत अनेक पुरातन वृक्ष आहेत. महामार्गाच्या कामात आतापर्यंत अनेक वृक्ष समूळ नष्ट केले आहेत. पुढील कामात हे वृक्ष न तोडता नवीन तंत्रज्ञानाद्वारे हे वृक्ष समूळ उचलून ते दुसऱ्या ठिकाणी लावण्याचे आमचे धोरण आहे व तशी एका भारतीय कंपनीशी बोलणी सुद्धा केली आहे. मुंबई - गोवा महामार्गाच्या दुतर्फा वृक्षारोपण करीत हा महामार्ग ग्रीन हायवे करण्याचा शासनाचा मानस आहे. थोर निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या दास भक्तांच्या माध्यमातून राज्यात २३ लाख झाडे लावण्यात आली असल्याचे आताच झालेल्या भेटीत त्यांनी मला सांगितले. कोकण कायम निसर्गरम्य राहण्यासाठी सामाजिक - शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून वृक्ष लागवडीची योजना राबविण्यात येणार असून त्यासाठी शासन दीडशे ते दोनशे कोटी रुपये खर्च करणार असल्याचे ना. गडकरी यांनी स्पष्ट केले. 
 
भाऊंचा धक्का ते मांडवा अशी रो -रो सर्व्हिस लवकरच चालू करण्यात येत असून त्यासाठी दोन अद्ययावत बोटी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. नेरुळला सुद्धा अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कोकणात जलवाहतुकीला जास्तीत जास्त प्राधान्य देण्यात येणार आहे. पाणी आणि रस्ता अशा दोन्ही मार्गावर चालणारी बस मुंबईत सध्या उपलब्ध करण्यात आली असून आचारसंहिता संपल्यानंतर ती पर्यटकांसाठी खुली करण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले. अंबा नदीतील गाळ काम सुद्धा देण्यात आले असून धरमतर - नागोठणे जलवाहतूक पूर्ववत चालू होईल. पनवेल - इंदापूर मार्गात काही ठिकाणी जमीन संपादनाची प्रक्रिया काही दिवसांत पूर्ण केली जाईल व २०१८ साल संपायच्या आत हा मार्ग पूर्णत्वास जाईल असा पुनरुच्चार ना. गडकरी यांनी शेवटी केली. यावेळी भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार, रायगड जिल्हाध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर यांचेसह राष्ट्रीय महामार्ग खात्याचे वरिष्ठ अधिकारी तसेच भाजपचे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.