सरकारमधील एकही आमदार फुटणार नाही : जयंत पाटील
मध्य प्रदेशपाठोपाठ राजस्थानमध्येही काँग्रेसचे सरकार धोक्यात आले आहे. सरकारविरोधात बंड करणार्या सचिन पायलट यांनी राजस्थानमधील अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकार संकटात आणले आहे. याच दरम्यान महाराष्ट्रातही ऑक्टोबरमध्ये सरकार पाडण्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र या सर्व चर्चा राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी फेटाळून लावल्या आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा एकही आमदार फुटणार नाही आणि फुटला तरी तीन पक्षांच्या ताकदीसमोर तो निवडूनच येणार नाही, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार भक्कम आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राजस्थानची पुनरावृत्ती होण्याचा प्रश्नच नाही. सरकारमधील आमदार फुटलाच तर फुटलेल्या आमदारासमोर आमच्या तिन्ही पक्षाचा एकच उमेदवार उभा राहील. त्यामुळे तीन पक्षाच्या ताकदीसमोर फुटलेला आमदार निवडूनच येऊ शकणार नाही, असे जयंत पाटील म्हणाले.
राज्यात कुणाची किती ताकद आहे ते बघायचे असेल तर पुन्हा सगळे वेगवेगळे लढू. चारही पक्ष वेगवेगळे लढूया. कुणाच्या जागा जास्त येतात ते बघू, असे आव्हान देखील भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. चंद्रकांत पाटील यांच्या या आव्हानावर देखील जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भाजपाने एकदा स्वतंत्र लढून बघावे, राज्यात त्यांना ६०-६५ जागांवरच समाधान मानावे लागेल. त्यापेक्षा ते अधिक जागा जिंकूच शकत नाहीत, असा प्रतिटोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.