बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 24 ऑक्टोबर 2021 (09:59 IST)

राज्यातला एक तक्रारदार गायब आहे - उद्धव ठाकरे

"राज्यात सध्या एक तक्रारदारच गायब झाला आहे. त्याने तक्रार केली, आरोप केले आणि पळून गेला. कुठे गेला काहीच माहीत नाही पण त्याच्या तक्रारीवरून इकडे तपास आणि धाडींचे सत्र सुरू आहे', असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परमबीर सिंग यांचं नाव न घेता टीका केली आहे.
 
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या विस्तारीत इमारतीचे उद्घाटन शनिवारी (23 ऑक्टोबर) सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या हस्ते झालं. यावेळी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.
 
ठाकरे यांनी यावेळी व्यवस्थेमधील काही विषयांवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. न्यायदान प्रक्रियेच्या विलंबात सर्वसामान्य माणूस पिचला जातो. कोर्टात चकरा मारून आयुष्य संपते आणि खर्चही परवडत नाही. म्हणून न्यायदानाची प्रक्रिया गतिमान करण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळीच परमबीर सिंग यांच्यावरही त्यांनी नाव न घेता निशाणा साधला.
 
अँटिलिया स्फोटक-सचिन वाझे प्रकरण समोर आल्यानंतर मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीचे आरोप केले होते. सध्या या प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरू आहे.
 
गेल्या काही काळापासून परमबीर सिंग यांच्यासह माजी गृहमंत्री अनिल देशमुख हेसुद्धा गेल्या कित्येक दिवसांपासून सार्वजनिक ठिकाणी दिसले नाहीत.