1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2023 (21:11 IST)

12 वी च्या लेखी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया येत्या 9 ऑक्टोबरपासून

महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत  इयत्ता बारावीच्या फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये होणाऱ्या लेखी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया येत्या 9 ऑक्टोबरपासून सुरू केली जाणार आहे. राज्य मंडळाकडून याबाबतच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
 
मंडळाच्या सचिव अनुराधा ओक  यांनी यासंदर्भात माहिती दिली. मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक यापुर्वीच जाहीर केले आहे. त्यानुसार इयत्ता बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 23 मार्च या कालावधीत तर दहावीची परीक्षा 1ते 22 मार्च या कालावधीत होणार आहे.
 
आता मंडळाकडून इयत्ता बारावी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज सरल डाटाबेसवरून ऑनलाईन पध्दतीने त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत भरायाचे आहेत. व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआयचे विषय घेऊन परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज महाविद्यालय प्रमुखामार्फत प्रचलित पध्दतीने भरावयाची असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.
 
मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 9 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह परीक्षा अर्ज भरता येणार आहेत. परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फतच अर्ज भरावेत, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.
 
दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी- मार्च 2024 परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेचे दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाची अधिकृत वेबसाइट www.mahahsscboard.in वर उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच वेबसाइटवरुन परीक्षेचे अर्जही भरता येणार आहेत.

Edited By - Ratnadeep Ranshoor