रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 11 जुलै 2022 (23:14 IST)

येत्या 5 वर्षात रस्त्यावरून पेट्रोलची वाहने गायब होतील, नितीन गडकरींचा मोठा दावा

nitin gadkari
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांसाठी ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली महामार्ग उभारणीचे अनेक नवे विक्रम प्रस्थापित झाले. याशिवाय रस्ते आणि वाहनांच्या सुरक्षेबरोबरच हरित ऊर्जेच्या वापरावरही ते भर देत असतात. अलीकडेच ते  हायड्रोजनवर चालणाऱ्या कारने चर्चेत आले होते .आता पुढील पाच वर्षांत पेट्रोलच्या गाड्या भारतातील रस्त्यांवरून गायब होतील, असा दावा मंत्र्यांनी केला आहे. पाच वर्षांनंतर भारतात पेट्रोलची गरज भासणार नाही, असेही ते म्हणाले. 
 
गडकरी म्हणाले की, हरित इंधनामुळे आगामी काळात पेट्रोलची गरज संपुष्टात येईल. त्यांनी दावा केला की, काही वर्षांनी देशातील केवळ कारच नव्हे तर स्कूटरही ग्रीन हायड्रोजन, इथेनॉल फ्लेक्स इंधन, सीएनजी किंवा एलएनजीवर चालतील.केंद्रीय मंत्री गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातील अकोला येथे एका कार्यक्रमात सहभागी होत असताना त्यांनी हे वक्तव्य केले  अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. आपल्या भाषणात गडकरींनी हायड्रोजन, इथेनॉल आणि इतर हरित इंधनाच्या वापरावर विशेष भर दिला. 
 
केंद्रीय मंत्री म्हणाले, 'मला पूर्ण विश्वासाने सांगायचे आहे की येत्या पाच वर्षांत भारतात पेट्रोल गायब होईल. तुमच्या कार आणि स्कूटर एकतर ग्रीन हायड्रोजनवर किंवा इथेनॉल फ्लेक्स इंधन, सीएनजी किंवा एलएनजीवर चालतील. पुढील पाच वर्षांत या क्षेत्राचा विकास दर सध्याच्या 12 टक्क्यांवरून 20 टक्क्यांपर्यंत वाढवावा, असे आवाहनही गडकरींनी कृषी क्षेत्रातील अभ्यासकांना केले. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील शेतकरी अत्यंत हुशार आहेत. त्यांना नवनवीन संशोधन आणि नवीन तंत्रज्ञान अवगत करून हुशार बनवण्याची गरज आहे. 
 
गडकरींनी गेल्या महिन्यात भारत-NCAP म्हणजेच भारताच्या नवीन कार सुरक्षा मूल्यांकन कार्यक्रमाच्या लाँचबद्दल माहिती दिली होती. याअंतर्गत आता क्रॅश टेस्टमधील कामगिरीच्या आधारे कारला देशात स्टार रेटिंग दिले जाणार आहे. यामुळे भारतात धावणाऱ्या आणि विकल्या जाणार्‍या कारच्या सुरक्षिततेची खात्री होईल.