२०० हून जास्त मुलांना विषबाधा, एकाचा मृत्यू
मुंबईतल्या गोवंडीतील महापालिकेच्या संजय नगर इथल्या मनपा शाळेत २००हून जास्त मुलांना विषबाधा झाली आहे. उर्दू माध्यमातील शाळेत दिल्या जाणाऱ्या औषधामुळे या मुलांना विषबाधा झाली आहे. या घटनेत एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असून चांदनी साहिल शेख असं या दुर्दैवी मुलीचं नाव आहे. जवळपास १७३ विषबाधित विद्यार्थ्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर, ५५ विद्यार्थी शताब्दी रुग्णालयात दाखल आहेत. यापैकी चौघांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतंय.
महापालिकेच्या या शाळेत दिल्या गेलेल्या लोहाच्या गोळ्यांतून विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. सोमवारी शाळेत विद्यार्थ्यांना लोहाच्या गोळ्या देण्यात आल्या होत्या. त्यानंतर या मुलांना मळमळ आणि उलट्या झाल्या. काही मुलांना तर रक्ताच्या उलट्या होवू लागल्यानं त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं.