प्रथमेश पवारांना अखेरचा निरोप
जावली तालुक्यातील बामणोली तर्फ कुडाळ गावचे जवान प्रथमेश संजय पवार (वय 22) यांना कर्तव्यावर असताना जम्मू सांबा ब्लॉक येथे झालेल्या चकमकीत वीरमरण आले. त्यांना आज साश्रूनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. आज सकाळर साडेदहाच्या सुमारास येथील दत्तमंदिरानजीक मोकळ्या पाटांगणावर शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शहिद जवान प्रथमेश यांना अखेरचा निरोप देण्यासाठी कुटुंबीय, मित्रपरिवारसह, संपूर्ण जावळी तालुक्यासह जिल्ह्यातून हजारो लोक येथे आले होते. त्यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
प्रथमेश संजय पवार हे तीन महिन्यांपूर्वीच सैन्यदलात भरती झाले होते. सीमा सुरक्षा दलात दाखल होण्याचे स्वप्न लहानपणापासूनच पवार यांनी पाहिले होते. ते स्वप्न वयाच्या 22 व्या वर्षी त्यांनी पूर्ण केले. अवघ्या तीन महिन्यापूर्वी भरती झालेले प्रथमेश पवार यांनी देशासाठी बलिदान दिले आहे. शहिद प्रथमेश यांचे मावसभाऊ अमोल गंगोत्रे (रा. बामणोली तर्फ कुडाळ) यांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, 19 मे रोजी रात्री जवान प्रथमेश पवार हे जम्मू सांबा ब्लॉक परिसरात कर्तव्य बजावत होते.
त्यावेळी अचानक दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू झाली. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देतानाच प्रथमेश यांना गोळी लागली. यात ते गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.