शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 जुलै 2021 (07:49 IST)

प्रवीण परदेशी यांनी काही तासांतच दिला नव्या पदाचा राजीनामा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे अधिकारी अशी ओळख असलेले सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांना ठाकरे सरकारने मराठी भाषा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिवपदाची जबाबदारी दिली होती. मात्र, अवघ्या काही तासातच त्यांनी या पदाचा राजीनामा दिला आहे. इतकेच नाही तर परदेशी हे केंद्र सरकारच्या नॅशनल कॅपिसिटी बिल्डिंग कमिनशनचे सदस्य म्हणून प्रशासनात रुजू झाले आहेत.
 
कोरोना काळात ठाकरे सरकारने प्रवीण परदेशी यांना मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावरुन हटवले होते. त्यानंतर त्यांची अन्य विभागात बदली झाली. मग परदेशी हे राज्याच्या मुख्य सचिवपदाच्या शर्यतीत होते. पण इथेही त्यांच्या पदरी निराशा आली. यानंतर ठाकरे सरकारने कालच ७ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यावेळी प्रवीण परदेशी यांना मराठी भाषा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिवपदाची जबाबदारी दिली होती. मात्र परदेशींनी अवघ्या काही तासातच राजीनामा देऊन, केंद्रात जाणे पसंत केले.
 
ठाकरे सरकारने मे २०२० मध्ये तत्कालिन मुंबई महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांची बदली केली होती. मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या आवरत नसल्याने ही कारवाई केल्याचं सांगण्यात आले होते. प्रवीण परदेशी यांना नगरविकास विभागात अतिरिक्त मुख्य सचिवपदी बदली करण्यात आली होती.
 
प्रविण परदेशी यांनी मे २०१९ मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला होता. याआधी त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहिले होते . परदेशी यांनी आपल्या २९ वर्षांच्या कार्यकाळात लातूर आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणूनही काम पाहिले आहे.