शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 30 जून 2022 (07:58 IST)

नाशिकमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय महानुभाव संमेलनाची जय्यत तयारी सुरू

nashik
भारतीय संस्कृतीत अनेक धर्म – पंथ आहेत, त्यापैकीच एक महत्त्वाचा मानला जाणारा पंथ म्हणजे महानुभाव पंथ होय, या पंथाचे संस्थापक तथा प्रवर्तक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या अवतार कार्याला यंदा आठशे वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतार दिन अष्ट शताब्दी महोत्सवानिमित्त अखिल भारतीय महानुभाव संमेलन दि. २९ ते ३१ ऑगस्ट २०२२ रोजी नाशिक येथे गंगापूर रोडवरील डोंगरे वस्तीगृह मैदानावर आयोजित करण्यात आले आहे.
 
विशेष म्हणजे या महानुभाव संमेलनात नाशिक शहर जिल्हा, इतकेच नव्हे तर राज्यातील अन्य जिल्ह्यांमधील त्याचप्रमाणे गुजरात, दीव दमण, दादरा नगर हवेली, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, नवी दिल्ली यासह उत्तर भारतातील तसेच दक्षिण भारतातील महानुभावपंथीय संत, महंत, तपस्विनी, उपदेशी, अनुयायी आणि सद भक्त प्रचंड संख्येने सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू असून या संदर्भात नियोजनाबाबत आढावा बैठक  संपन्न झाली.
 
या बैठकीप्रसंगी अनेक संत-महंत आणि कार्यक्रमाचे मुख्य आयोजक व उपदेशी मंडळी यांनी उपस्थित राहून चर्चेत सहभाग घेतला. याप्रसंगी बैठकीच्या अध्यक्षस्थानी आचार्य प्रवर महंत सुकेणेकर बाबा उपस्थित होते. यावेळी आचार्य प्रवर महंत चिरडे बाबा यांनी सांगितले की, सुमारे आठशे वर्षांपूर्वी श्री चक्रधर स्वामी यांनी महाराष्ट्रात तत्कालीन सामाजिक विषमतेविरुद्ध बंड पुकारत समतेचा झेंडा रोवला, इतकेच नव्हे तर मराठी भाषेच्या पाया देखील महानुभाव पंथाने घातला असून या पंथात मराठी भाषेतील हजारो ग्रंथ आहेत. मराठी भाषेला टिकविण्याचे आणि वृद्धिंगत करण्याचे महान कार्य महानुभाव पंथाने केले आहे. सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांच्या विचारांना सर्वांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित या महानुभाव संमेलनात तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, त्या कार्यक्रमाची जोरात तयारी आता सुरू झालेली आहे.यावेळी महंत मराठे बाबा, महंत डोळसकर बाबा, महंत वाऱ्हेराज बाबा, पू. श्री. गोपिराज शास्त्री, पू. श्री. अर्जुनराज सुकेणेकर, पू. श्री. श्रीधरानंद सुकेणेकर तसेच माजी आमदार बाळासाहेब सानप, नगरसेवक दिनकर अण्णा पाटील, दत्ता गायकवाड, प्रकाश भाऊ ननावरे, प्रकाश शेठ घुगे आदींनी संमेलनाच्या नियोजनाबाबत आपआपली मते व्यक्त केली