1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 24 ऑगस्ट 2021 (23:34 IST)

महाड कोर्टाकडून राणे यांना जामीन मंजूर

raigad magistrate
तासभर झालेल्या सुनावणीनंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाड न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे राणे यांना मंगळवारी दुपारी संगमेश्वरहून अटक करण्यात आली होती. रात्रीच्या सुमारास त्यांना महाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. त्यानंतर त्यांना रायगड दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. राणेंवर लावण्यात आलेली कलमे चुकीची आहेत. या प्रकरणाला १५३ आणि ५०५ ही कलमे लागू होऊ शकत नाहीत. त्यांच्यावर राजकीय प्रेरित कलमे लावली. तसेच राणेंना अटक करण्यापूर्वी कोणतीही लेखी नोटीस दिली नाही. त्यामुळे राणेंना जामीन देण्यात यावा अशी मागणी राणेंचे वकील अनिकेत निकम यांनी केली. तसेच त्यांच्या प्रकृतीचे कारणही देण्यात आले. त्यानुसार राणे यांना जामीन मंजूर करण्यात आला.
 
दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिष्ठेबाबत बोलल्याने त्यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी. त्यांनी केलेल्या वक्तव्यामागे कोणते राजकीय षडयंत्र होते का, हे शोधणे गरजेचे आहे. नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत. ते जबाबदार व्यक्ती आहेत, मग त्यांच्याकडून असे बेजबाबदार वक्तव्य झालेच कसे? असा युक्तिवाद शासकीय वकिलांकडून करण्यात आला. मात्र, दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून राणे यांना जामीन मंजूर करण्यात आला. दरम्यान, नारायण राणेंच्या जामिनावर सुनावणी सुरु असतानाच त्यांच्या पत्नी नीलम राणे न्यायालयाच्या परिसरात पोहोचल्या होत्या. नीलम यांच्यासह दोन्ही मुले नितेश आणि निलेश राणे सुनावणीच्या वेळी न्यायालयाच्या परिसरात उपस्थित होते.