महाराष्ट्र, गोवा तसेच दक्षिणेत पाऊस घटणार
महाराष्ट्र, गोवा, तसेच दक्षिणेकडील बऱ्याच राज्यातील पावसाचा जोर ओसरणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली, तर शनिवारनंतर पूर्वेकडील राज्यात पावसाची तीव्रता अधिक राहण्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात लागोपाठ निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रांमुळे गेले दोन आठवडे राज्याला पावसाने झोडपले आहे. गुरुवारीही विदर्भ, कोकण गोवा, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हय़ांत रेड तसेच ऑरेंज अलर्ट होता. या पावसाने जुलै महिन्याचीही सरासरी ओलांडली असून, अनेक भागात ओला दुष्काळ जाहीर करण्याची वेळ आली आहे. दरम्यान, येत्या 24 तासांनंतर या पावसाचा जोर कमी होणार असून, शनिवारपासून अनेक भागांत तुरळक पावसाचा यलो अलर्ट आहे.
सध्या बंगालच्या उपसागरात ओरिसा व आंध्र किनारपट्टीजवळ असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली आहे. पंजाब व लगतच्या भागावर हवेची द्रोणीय स्थिती आहे. कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाल्याने महाराष्ट्रातील पाऊसही ओसरणार आहे.
शुक्रवारी ऑरेंज अलर्ट असलेले जिल्हे
ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, गोंदिया भंडारा
शनिवार ऑरेंज अलर्ट
पुणे, रायगड
रविवार ऑरेंज अलर्ट
कुठेच नाही
देशभरात सरासरीच्या अधिक पाऊस
दरम्यान, दमदार पावसामुळे देशभरातील पावसाची तूट भरुन निघाली असून, सरासरीच्या 5 टक्के अधिकचा पाऊस नोंदविण्यात आला आहे. पूर्व तसेच पूर्वोत्तर भारतातील काही राज्ये वगळता देशातील इतर राज्यांत पावसाने सरासरी ओलांडली आहे.
महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकात आबादानी
जुलै महिन्याच्या पावसाने महिना संपायच्या आधीच सरासरी ओलांडली असून, महाराष्ट्रात अतिरिक्त सरासरीच्या 56 टक्के अधिक, गोव्यात अतिवृष्टी सरासरीच्या 92 टक्के अधिक, तसेच कर्नाटकात अतिवृष्टी होत सरासरीज्च्या 63 टक्के अधिक पाऊस झाला आहे.
Edited By - Ratnadeep Ranshoor