१७ सप्टेंबरपासून राज ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर
येत्या १७ सप्टेंबरपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशीच दौऱ्याचा श्रीगणेशा होणार असून याची सुरूवात विदर्भातून होणार आहे. पक्षबांधणीसाठी राज ठाकरेंनी राज्यव्यापी दौरा हाती घेतला आहे. राज ठाकरेंनी ज्या तारखेचा मुहूर्त निवडला आहे, तो योगायोगाने नरेंद्र मोदी यांचा ७२ वा वाढदिवस आहे.
दोन दिवसीय नागपूर दौऱ्यानंतर राज ठाकरे चंद्रपूर आणि अमरावतीत पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. ठाकरेंच्या दौऱ्यानिमित्त विदर्भात मनसे पक्ष संघटना बळकट करण्याचा प्रयत्न करणार आहे. राज ठाकरेंच्या दौऱ्याचं नियोजन करण्यासाठी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे नागपूरला जाणार आहेत. राज्यातील सत्तांतरानंतर राज ठाकरेंचा हा पहिलाच दौरा आहे.
राज ठाकरेंवर अलीकडेच शस्त्रक्रिया पार पडली आहे. तसेच डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. परंतु शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर राज ठाकरे आता पुन्हा एकदा पक्ष संघटनेत सक्रीय झाले आहेत. विदर्भासह ते मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असा दौरा करणार आहेत.