महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले मोठे वक्तव्य
नाशिक : राज्यामध्ये पदवीधर मतदारसंघाच्या ४ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. नाशिकच्या उमेदवारीवरुन काँग्रेसमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे, काँग्रेसने सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, सुधीर तांबे यांनी अर्ज माघारी घेतला, दरम्यान तांबे यांचे चिरंजीव सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरुन नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये उडी घेतली आहे. तर दुसरीकडे काल (दि. २९) भाजपच्या स्थानीक कार्यकर्त्यांनी तांबे यांना पाठिंबा दिला आहे. या संदर्भात आज (दि. ३०) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
दरम्यान, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोणी गावातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यालयात पदवीधर मतदानाचा हक्क बजावला. सत्यजित तांबे यांचा विजय निश्चित असून सत्यजित तांबे यांनी भाजपात प्रवेश केला पाहिजे. यासाठी आमचा आग्रह राहणार असल्याचे म्हणत सुधीर तांबेंचे काँग्रेसचे रक्त कमी व्हायला अजून थोडा वेळ लागेल अस मिश्कील वक्तव्य देखील विखे पाटलांनी केले आहे.
आज नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडत असून यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत मोठे वक्तव्य केले आहे. ते यावेळी म्हणाले की, सत्यजित तांबे यांचा विजय निश्चित असून अन्य उमेदवारांची चर्चा करण्याची आवश्यकता नाही. मामांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र, मामाने पक्षाला देखील मामा बनवले अशी टीका विखे पाटलांनी बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता केली आहे. सत्यजित तांबे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला पाहिजे, यासाठी आमचा आग्रह राहणार आहे. मतदारसंघामध्ये बहुतांश ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी सत्यजितसाठी काम केले. भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या सहकार्याचा आदर, सन्मान नैतिकता म्हणून सत्यजित ठेवतील, याचा मला विश्वास असल्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले की, सुधीर तांबे तीनदा काँग्रेस पक्षाकडून निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांच्या रक्तामध्ये काँग्रेस थोडीशी तरी असणारच. काँग्रेसचे रक्त कमी व्हायला अजून थोडा वेळ लागेल, असे मिश्किल वक्तव्य विखे पाटलांनी केले आहे. आम्ही अजून देखील काँग्रेसचे असून आमच्या रक्तामध्ये काँग्रेस असल्याचे सुधीर तांबे यांनी म्हटले आहे. त्यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडी ही टोळी असून ही मंडळी कोणत्याही विचारधारा अथवा कोणत्या एका मुद्द्यावर एकत्र आली नव्हती. घरोबा एका बरोबर आणि संसार दुसऱ्या बरोबर अशी महाविकास आघाडीची अवस्था आहे. काँग्रेसचा अधिकृत उमेदवार या निवडणुकीत राहिला नाही. काँग्रेसचे सोकॉल्ड नेते घरात बसून आहेत आणि काँग्रेस नेतृत्व त्यांच्यावर कारवाईसुद्धा करत नाही, अशी टीका विखे पाटलांनी नाशिक पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भूमिकेबद्दल केली आहे.
पुढे ते म्हणाले, कालच्या मोर्चावरून संजय राऊत यांनी भाजपवर टीका केल्यानंतर विखे पाटलांनी संजय राऊत यांच्या टीकेचा समाचार घेतला आहे. कालचा मोर्चा सकल हिंदू समाजाचा होता. त्यामध्ये सगळ्या पक्षाचे लोक सहभागी झाले होते. हिंदूत्वाशी फारकत घेतलेल्या ठाकरे सेनेला यावर बोलण्याचा अधिकारच नाही. मोर्चा कोणत्या सरकार विरोधात नाही तर लव्हजिहाद आणि धर्मांतरा विरोधात जागृती करण्यासाठी होता. शिवसेनेचा लव्ह जिहादला आणि धर्मांतराला पाठींबा आहे का..? असा प्रश्न राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठाकरे सेनेला केला आहे. तर आमच्यावर टिका करण्यापेक्षा तुमची भुमिका स्पष्ट करा. या राज्यामध्ये लव्ह जिहाद आणि धर्मांतराचे प्रकार खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा देखील विखे पाटलांनी दिला आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor