मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 4 ऑक्टोबर 2021 (08:33 IST)

कोविडमध्ये अनाथ झालेल्या बालकांच्या खात्यात ५ लाख रुपये

कोविड महामारीच्या संकटाने राज्यातील अनेक बालकांचे छत्र हिरावून नेले. दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना मदत म्हणून प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याप्रमाणे अशा बालकांच्या खात्यात ५ लाख रुपये जमा केले असल्याची माहिती, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.
 
कोविड महामारीमुळे गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यातील शेकडो बालके आई वडिलांचे छत्र हरपल्याने अनाथ झाली आहेत. अशा बालकांच्या भविष्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी, एकूणच त्यांच्या संरक्षणासाठी काही आर्थिक तरतूद करणे गरजेचे होते, यासाठी महिला बाल विकास विभागाच्यावतीने ॲड. यशोमती ठाकूर यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
 
या पाठपुराव्यानंतर कोविड महामारीत अनाथ झालेल्या बालकांच्या खात्यामध्ये प्रत्येकी ५ लाख रुपये जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानुसार नुकतेच राज्यातील ३०६ अनाथ बालकांच्या खात्यात सुमारे १५ कोटी ३० लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत कोरोनामुळे अनाथ बालकांची राज्यातील एकूण संख्या सुमारे सहाशे इतकी असून उर्वरित बालकांच्या खात्यातही लवकरच पैसे जमा करण्यात येतील, अशी माहितीही ॲड.  ठाकूर यांनी दिली आहे. राज्यातील गोंदिया, चंद्रपूर, सांगली, वर्धा, सोलापूर रायगड आलिबाग, रत्नागिरी, नाशिक, अमरावती आणि पुणे, नागपूर अशा विविध २४ जिल्ह्यांमधील बालकांच्या खात्यात पैसे वर्ग झाल्याचा तपशील विभागाकडे नुकताच प्राप्त झाला आहे. यामुळे या बालकांना काही प्रमाणामध्ये आर्थिक सुरक्षितता देता आली असून विविध योजनांच्या माध्यमातून या बालकांच्या शिक्षण आणि संगोपनासाठी प्रयत्न केले जातील असेही, ॲड. ठाकूर यांनी यावेळी सांगितले.