testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

साहित्यामध्ये मराठी-कानडी भेद नाही – डॉ. शिवप्रकाश

shiv prakash
महाराष्ट्र आणि कर्नाटकचे ऋणानुबंध खूप जुने असून थेट विठ्ठलाच्या माध्यमातून ते एकमेकांशी जोडले गेले आहेत. त्यामुळे या दोन राज्यांत सीमा रेषेचा वाद असला तरी मात्र मराठी कानडी असा कोणताही भेद नसल्याचे प्रख्यात कन्नड साहित्यिक तथा कवी, नाटककार, समीक्षक प्रा. डॉ. एच. एस. यांनी नाशिक येथे बोलताना सांगितले.
महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाच्या वतीने यंदाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार प्रा. शिवप्रकाश यांना तर बाबुराव बागुल कथालेखन पुरस्कार लातूरच्या सौ. मेनका धुमाळे यांना अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांच्या हस्ते शानदार समारंभात प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरूप होते. विद्यापीठातर्फे दिला जाणारा हा आठवा पुरस्कार होता. तर बाबुराव बागुल कथालेखन पुरस्काराचे रुपये २१ हजार रोख असे स्वरूप होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन होते. यावेळी व्यासपीठावर कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, विद्यार्थी कल्याण विभागाच्या डॉ. विजया पाटील उपस्थित होते.
भाषा एकमेकांशी जोडणारं माध्यम
प्रा. डॉ. एच. एस. शिवप्रकाश म्हणले, प्रत्येक भागाची लिखाणाची संस्कृती आणि संदर्भ बदलत जातात. त्या-त्या भागाच्या परिस्थितीचे तरंग त्यात उमटतात. बहुभाषा असणाऱ्या देशात तर हे जास्तच लागू आहे. परंतु भाषा हे या सर्वांना एकमेकांशी जोडणारं माध्यम आहे. आणि हीच वेगळी शक्ती या सर्वांचा भाग म्हणून कुसुमाग्रजांच्या नगरीत घेऊन आली. दोन व्यक्तींमधील वैचारिक, भावनिक व सांकृतिक देवाणघेवाणीचं ते माध्यम आहे. आपल्या संस्कृतीचे संवर्धन करण्यात तिची महत्त्वाची भूमिका आहे. हाच सर्व भाग भाषांतरित साहित्यालाही लागू होतो. साहित्यिकांनी लेखन करताना मनापासून सोपेपणा आणण्याच्या दृष्टीकोनातून काम केल्यास कोणत्याही भाषेतील साहित्याचा रसास्वाद घेता येईल, असा विश्वास व्यक्त करून सृजनशील लिखाणात सर्वांना जोडण्याची आणि सामावून घेण्याची ताकद असल्याचे शिवप्रकाश यांनी शेवटी सांगितले.

डॉ. अक्षयकुमार काळे म्हणाले, मराठीत अनेक दर्जेदार साहित्यकृती आहेत. मात्र त्यातील अनेक साहित्य दर्जेदार असूनही केवळ अनुवाद न झाल्याने सीमित राहिले. भारतीय साहित्यावर जागतिकीकरणाचा मोठा प्रभाव पडत आहे. यामुळे भाषा आणि संस्कृतीचे नातेसंबंधात दरी निर्माण झाल्याचे सांगून स्थानिक भाषांपुढे इंग्रजी भाषेचे मोठे आव्हान ठाकल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


यावर अधिक वाचा :