गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पिंपरी-चिंचवड , गुरूवार, 24 नोव्हेंबर 2016 (09:48 IST)

विद्यार्थी प्रतिनिधींना तिकीटांसाठी आग्रह धरण्याचे आश्वासन – संग्राम कोते पाटील

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेची संघटनात्मक बांधणी करण्याच्या दृष्टीने थेरगावात राष्ट्रवादी विद्यार्थी काँगेसच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीत विद्यार्थी पदाधिकाऱ्यांना उमेदवारीसाठी पक्षनेतृत्वाकडे आग्रह धरण्यात येईल असे आश्वासन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी केले.
 
यावेळी बोलताना कोते पाटील म्हणाले की पक्ष संघटनेत निष्ठावंतांना न्याय आहे. घराणेशाहीला स्थान नसून काम करणा-या कार्यकर्त्यांना मान आहे. याचे उदाहरण म्हणून नाशिक पदवीधर मतदारसंघात उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. सरकारवर टीका करताना ते म्हणाले, नवीन शासन काळात फक्त घोषणांचा पाऊस पाडण्यात आला प्रत्यक्षात मात्र शासनाकडून जनतेच्या पदरी निराशाच पडली. महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाच्या ढिसाळ कारभारावरही त्यांनी टीका केली. गेल्या दोन वर्षापासून आयोगाच्या परीक्षा घेतल्या गेल्या नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी बेरोजगार असून त्यांची अधिकारी बनण्याची स्वप्ने भंगली आहेत. हे शासन विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत आहे असा आरोप त्यांनी भाजपा सरकारवर केला.
 
या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, युवा नेते नाना काटे, मयुर कलाटे, सिद्धेश्वर वारणे यांच्यासह राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.