गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 18 जुलै 2018 (09:30 IST)

‘संविधान बचाव, देश बचाव’आंदोलनाची लाट विदर्भात

नागपूर येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आयोजित‘संविधान बचाव’आंदोलनास उत्स्फुर्त असा प्रतिसाद मिळाला. राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उभारलेल्या या लढ्यास जिंकण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया खान यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या महिला या मैदानात उतरल्या आहेत.‘संविधान बचाव, देश बचाव’आंदोलनादरम्यान देशात असमानता पसरविणाऱ्या मनुस्मृतीचे तसेच लोकशाही तत्त्वाला धक्का देणाऱ्या इव्हिएम मशिनचे प्रतिकात्मक दहन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत भाजप सरकारचा निषेध करण्यात आला.
 
देशात वाढलेला जातीयवाद, हिंसा यावरून स्पष्ट होते की सत्ताधारी जनतेला हीन लेखून कार्य करत आहेत, अशी टीका आ. छगन भुजबळ यांनी केली. संविधानविरोधी कृती करणाऱ्या लोकांच्या मार्गाचा अडथळा ठरून संविधानात नोंदवलेला समानता, बंधुता, धर्मनिरपेक्षता हा प्रत्येक शब्द तंतोतंत पाळण्याची प्रतिज्ञा करूया, असे आवाहन त्यांनी केले. शाहू-फुले-आंबेडकर यांनी देशात समानता आणण्यासाठी अतोनात प्रयत्न केले, मात्र आज भाजप सरकार राज्यात मनूवादी प्रवृत्ती रूजविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
 
आज देशातील अल्पसंख्याक, दलित, आदिवासी घटकांना सुरक्षित वाटत नाही. तळागाळातील सामान्य माणसाला केवळ घटनेचा आधार आहे. गेली अनेक वर्षे देश घडविण्यासाठी गेली, मात्र या ४ वर्षात विकासाची घडी विस्कटली असल्याची टीका विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी केली. डॉ. आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेने सामान्य माणसाला न्याय मिळाला. मात्र सत्तेत असलेले आरएसएस प्रणित सरकार हे घटनाविरोधी आहे. राष्ट्रवादीची नारीशक्ती रस्त्यावर उतरली आहे. जगण्याचा अधिकार देणाऱ्या संविधानाला धक्का लावण्याचा प्रयत्न कराल तर याद राखा, असा इशारा त्यांनी सरकारला दिला.
 
राष्ट्रवादीच्या आमदारांमार्फत सभागृहात सरकारविरोधात आवाज उठविला जात आहेच मात्र त्याला राष्ट्रवादी महिला काँग्रेसने उभारलेल्या संविधान बचाव मोहिमेची भक्कम साथ मिळत असल्याचे वक्तव्य विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केले. आज पवार साहेब महत्त्वाच्या बैठकीमुळे अनुपस्थित आहेत, मात्र त्यांचे आशीर्वाद पाठिशी असल्याचे ते म्हणाले. संविधानासारखे महान अस्त्र आपल्या हाती देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांपुढे नतमस्तक होत आपण संविधानाचे स्थान अढळ ठेवण्याचा पण करूया, असे आवाहन त्यांनी केले.
 
देशात द्वेषाचे वातावरण तयार झाले आहे. समाजातील अशांततेचे आक्रोशात रूपांतर व्हायला वेळ लागणार नाही. विकासासोबतच कायदा-सुव्यस्था ढासळत चालला असल्याची टीका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि या मोहिमेच्या प्रणेत्या फौजिया खान यांनी केली. भाजपातर्फे अशक्त भारताची निर्मिती केली जात आहे. हा लढा सशक्त लोकशाहीसाठी आहे. ‘संविधान के सन्मान मे, राष्ट्रवादी मैदान मे!’असा नारा त्यांनी दिला.
 
जनतेच्या सुरक्षेसाठी सत्तेत आलेल्यांची अन्याय, अत्याचारात आज भागीदारी वाढतेय. समाजातील कोणताच घटक सुरक्षित नाही, समाधानी नाही. देशाचा कणा असलेल्या संविधानाचे उल्लंघन केले जात आहे. हे आम्ही कदापि होऊ देणार नाही अशी ग्वाही माजी मंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
 
स्वातंत्र्य मिळाल्यापासून पहिल्यांदाच संविधान वाचविण्यासाठी आंदोलन करावे लागत आहे, हे सरकारचे अपयश असल्याचा दावा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला. भाजपच्या साफ नियतवर जनतेला शंका आहे. लव जिहाद, गोरक्षा यांसारख्या धोकादायक संकल्पना रूजविल्या जात आहेत. पण राष्ट्रवादीच्या महिला संविधान वाचविण्यासाठी पूर्ण ताकद लावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
हिंदूत्वाच्या नावाखाली ढोंगी राजकारण करणारे आता लोकांनी काय खावं, काय घालावं हे ठरवत आहेत. हा दहा तोंडी रावण आहे. या रावणाचा वध करण्याची जबाबदारी लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या प्रत्येकाची असल्याचे मत आ. विद्या चव्हाण यांनी व्यक्त केले.