मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 26 नोव्हेंबर 2018 (16:23 IST)

शिवसेना नेत्यांच्या राजीनाम्याच्या कागदी होड्या शरयू नदीत

राम मंदिर प्रश्नी उत्तर प्रदेश येथे गेलेल्या शिवसेना नेते आणि मंत्री यांनी नुकतीच हजेरी लावत राम मंदिर प्रश्न अधोरेखित केला. तर  अयोध्येतील शरयू नदीच्या काठावर काही कागदी होड्या सापडल्या असून, शिवसेनेच्या मंत्र्यांनी आरती झाल्यानंतर आपल्या खिशातील राजीनाम्याच्या कागदी होड्या करून शरयूमध्ये प्रवाहित केल्या आणि त्याच होड्या आज सकाळी नागरिकांना सापडल्याची माहिती असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर खोचक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. विखे पाटील म्हणाले की, दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे भाजपला उद्देशून म्हणाले होते, निर्लज्जांनो राम मंदिर तुम्ही बांधता की आम्ही बांधू? त्यामुळे अयोध्येला गेल्यानंतर ते आता राम मंदिराच्या बांधकामाचा शुभारंभच केल्याशिवाय मुंबईला परत येणार नाहीत, असाच अनेकांचा समज झाला होता. पण ते तर केवळ सहकुटूंब-सहपरिवार तिर्थयात्रेला गेल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मंदिर बनवणार की फक्त राजकारण करणार असा प्रश्न त्यांनी उभा केला आहे.