बुधवार, 18 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 3 फेब्रुवारी 2024 (16:18 IST)

भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार, नेमकं प्रकरण काय?

ganpat gaikwad
शुक्रवारी (2 जानेवारी) रात्री उशिरा भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून पोलीस स्टेशनमध्येच खुलेआम गोळीबार करण्यात आला आहे.
 
उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षकांच्या समोरच ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे.
 
भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबारात एकनाथ शिंदे गटाचे महेश गायकवाड आणि त्यांच्यासोबतचे सहकारी राहुल पाटील हेही जखमी झाले आहेत.
 
दोघांवर ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. तर महेश गायकवाड यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे.
 
महेश गायकवाड हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक आहेत.
 
तर गणपत गायकवाड हे कल्याण पूर्व या मतदारसंघातील भाजपचे आमदार आहेत.
 
शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड आणि भाजपचे आमदार गणपत गायकवाड दोघेही जमिनीच्या वादाप्रकरणी एकमेकांविरोधात तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये आले होते. तेव्हा दोघांमध्ये बाचाबाची झाली.
 
त्याचवेळी गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर एकूण सहा गोळ्या झाडल्याचं पोलिसांनी सांगितलं.
 
 
त्यानंतर पोलिसांनी आमदार गणपत गायवाड यांच्यासकट तिघांना अटक केली आहे. त्यांना आज शुक्रवारी (3 जानेवारी) न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
 
आमदार गणपत गायकवाड यांच्यावर हत्येचा प्रयत्न करण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
 
त्यांच्यावर IPC अंतर्गत 307, 120 (b) 143, 147, 148, 149 ही कलमे लावण्यात आल्याचं ठाण्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे यांनी सांगितलं.
 
या घटनेनंतर उल्हासनगर आणि परिसरात मोठा पोलीस बंदोबस तैनात करण्यात आला आहे.
 
दरम्यान उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी क्राईम ब्रँच एसआयटीची स्थापना केल्याचं सांगितलं आहे.
 
ACP निलेश सोनावणे यांच्या नेतृत्वात या प्रकरणाचा तपास करण्यात येणार आहे.
 
अजित पवार यांनीही या घटनेबद्दल नाराजी व्यक्त करत याबाबत आपण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचं म्हटलं आहे.
आमदार गणपत गायकवाड यांनी केलेला गोळीबार चुकीचा असल्याचं सांगत अजित पवार म्हणाले, "उल्हासनगरमधील घटना सर्वांनी पाहिली आहे. आमदार गायकवाड हे वैतागलेल्या माणसासारखे बोलत होते. पण संविधानाने दिलेल्या अधिकारांचा दुरुपयोग होणार नाही याची खबरदारी त्यांनी घेतली पाहिजे."
 
पोलीस स्टेशनमध्ये नेमकं काय घडलं?
जमिनीचा वाद मिटवण्यासाठी 2 फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास दोन्ही नेते उल्हासनगर हिललाईन पोलिस स्टेशनमध्ये पोहचले होते.
 
पोलीस FIR नुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या केबिनमध्ये आमदार गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यात बाचाबाची झाली.
 
त्यावेळी अचानक गणपत गणपत गायकवाड आणि हर्षल केने यांनी आपल्या जवळच्या बंदुकीतून महेश गायकवाड आणि राहुल गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडण्यास सुरूवात केली.
 
 
गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर एका पाठोपाठ एक अशा चार गोळ्या झाडल्या. महेश गायकवाड यांच्या पोटात आणि इतर अवयवांना चार गोळ्या लागल्या असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजते आहे.
 
याचवेळी गणपत गायकवाड यांच्या समर्थकांकडून महेश गायकवाड यांच्या समर्थकांना शिवीगाळ केली. तसंच खुर्च्या फेकून मारण्यात आल्या, असंही या FIR मध्ये म्हटलं आहे.
 
पोलीस स्टेशनमधील CCTV फुटेजनुसार, गोळीबारानंतर एकच गोंधळ उडाल्याचं दिसत आहे.
 
गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
पोलीस ठाण्यातच हा गोळीबार करण्यात आल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे.
 
विरोधकांकडून कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. तर त्यांनी या प्रकरणावरुन देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.
 
या राज्यात एकनाथ शिंदेंसारखे मुख्यमंत्री असतील तर इथे फक्त गुन्हेगारच निर्माण होतील, अशी टीका संजय राऊत यांनी केली. आहे.
 
भाजप आमदारांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा,अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
 
"महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेशी खेळ करण्याचं ओपन लायसन्स गृहमंत्र्यांनी भाजपाच्या नेत्यांना दिलंय का? पुण्यात भाजपाचे आमदार पोलिसांच्या कानाखाली मारतात आणि उल्हासनगरमध्ये माजी नगरसेवकांवर गोळीबार करतात. ही या खोके सरकारची सत्ता आणि पैशांची मस्ती आहे," असं सुळे यांनी म्हटलं आहे.
 
"महाराष्ट्रात भाजपाचे खुले 'गुंडाराज' सुरू आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हाताची घडी तोंडावर बोट ठेवून शांतपणे हे सगळं पाहत आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यातील ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेची गांभिर्याने दखल घेऊन महाराष्ट्र सरकार तातडीने बरखास्त करायला हवे," असंही सुळे यांनी म्हटलं.
 
दुसरीकडे गोळीबारानंतर गणपत गायकवाड यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
 
"एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत माझे पैसे बुडवले आहेत. मी आमदार निधीतून केलेल्या अनेक कामांचं श्रेय घेण्यासाठी प्रकल्पाच्या ठिकाणी श्रीकांत शिंदे हे जबरदस्तीने आपल्या नावाचा बोर्ड लावतात. एकनाथ शिंदे यांनी गुन्हेगारी पोसली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे," अशी मागणी आमदार गायकवाड यांनी केली आहे.
 
Published By- Priya Dixit