दिव्यांगांच्या लसीकरणासाठी दर शनिवारी विशेष शिबिर
अमरावतीमध्ये कोविड प्रतिबंधक लसीकरणात ज्येष्ठ व्यक्ती व दिव्यांगांच्या लसीकरणास प्राधान्य देण्यात येत आहे. त्याचबरोबर, दर शनिवारी दिव्यांगांच्या लसीकरणासाठी विशेष शिबिरांचेही आयोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी जिल्ह्यातील लसीकरणाचा आढावा ऑनलाईन बैठकीद्वारे घेतला, त्याचबरोबर अनाथ बालक संगोपन जिल्हा कृती दलाची (टास्क फोर्स) ऑनलाईन बैठकही त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी श्री. नवाल म्हणाले की, ठिकठिकाणी नियमितपणे होणा-या लसीकरणात वृद्धजन, दिव्यांग व्यक्तींच्या लसीकरणास प्राधान्य दिले जात आहे. त्याचबरोबर, दिव्यांगासाठीच्या शाळा, वसतिगृहे, पुनर्वसन केंद्रे, निवासी संस्था आदी ठिकाणी दर शनिवारी विशेष शिबिरांचेही आयोजन करण्यात यावे. लसीकरण केंद्रांवर टोकन सिस्टीम सुरु केल्यामुळे नागरिकांची गर्दी टळून त्यांच्या वेळेचीही बचत होत आहे. लसीकरण कार्यक्रमाला गती देण्यासाठी शिबिर मोडवर काम करणे आवश्यक आहे. त्यानुसार गॅस एजन्सी कर्मचारी, बँक कर्मचारी अशा विविध क्षेत्रांसाठी शिबिरांचे नियोजन करावे. कोरोना प्रतिबंधासाठी आघाडीवर कार्यरत आशा सेविका, आरोग्यसेविकांना मास्क आदी सामग्री नियमितपणे उपलब्ध करुन द्यावी, असेही निर्देश त्यांनी दिले.